शिराळा : औंढी (ता. शिराळा) येथील राष्ट्रवादीचे लोकनियुक्त सरपंच अभय पाटील यांच्या विरोधात भाजपा सदस्यांनी मंजूर केलेला अविश्वास ठराव ग्रामसभेत २१२ मतांनी मंजूर करण्यात आला.
सरपंच पाटील यांच्याविरुद्ध १५ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव विशेष सभेत मंजूर झाला होता. यानंतर तहसीलदार गणेश शिंदे यांनी शुक्रवारी ग्रामसभा बाेलावून अविश्वास ठरावावर मतदानाचे आयाेजन केले हाेते. अविश्वास ठरावाबाबत एकूण ५९८ मतदान नोंद झाले हाेते. यापैकी ५८४ मतदान झाले. विद्यमान सरपंच अभय पाटील यांच्या बाजूने १८६ मते, तर त्यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाच्या बाजूने ३९८ मध्ये पडली. १४ मते बाद झाली. यानुसार सरपंच अभय पाटील यांच्या विरोधातील अविश्वास ठराव २१२ मतांनी मंजूर झाला.
उपसरपंच शिवाजी कांबळे, सदस्य दिलीप लोहार, सुमन पाटील, लक्ष्मी चव्हाण, आक्काताई गुरव, पल्लवी खोत यांनी, सरपंच मनमानी कारभार करत आहेत. कोणत्याही सदस्यांना विश्वासात घेऊन काम करत नाहीत. कर्तुत्व, कर्तव्यात कसूर करत आहेत, असा आराेप केला हाेता. ग्रामपंचायतीच्या सातपैकी सहा सदस्यांनी एकत्रित येऊन अविश्वास ठराव मंजूर केला होता. लोकनियुक्त सरपंच असल्याने विशेष ग्रामसभा घेऊन अंतिम निर्णय घेण्यात आला.
तहसीलदार गणेश शिंदे व गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी सभेचे कामकाज पाहिले. अविश्वास ठराव जिकल्यानंतर सदस्यांनी गुलाल व फटाके उडवून जल्लोष केला. ग्रामस्थांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, भाजप युवा नेते सत्यजीत देशमुख, रणधीर नाईक यांची भेट घेतली.
फोटो : २२ शिराळा ५
ओळ : औढी (ता. शिराळा) येथे राष्ट्रवादीचे सरपंच अभय पाटील यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ग्रामसभेत मंजूर झाल्यानंतर भाजप सदस्य व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.