सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ व पॉझिटिव्हिटी रेटही दहा टक्क्यांवर असल्याने या आठवड्यातही निर्बंध कायम राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंदच राहणार असून, १९ जुलैपर्यंत निर्बंध कायम राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. दरम्यान, निर्बंध कायम राहिल्याने व्यापारी पेठा सोमवारपासून खुल्या होतील, या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे.
दि. ३ जून रोजी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटनुसार जिल्हा प्रशासनानेच पाच स्तरातील निर्बंध लागू करावयाचे आहेत. या नियमावलीत शासनाने बदल करत आरटीपीसीआर चाचण्यांनुसार पॉझिटिव्हिटी रेट नोंद करण्याचे निर्देश दिले होते. गेल्या आठवड्यापासून केवळ आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण व रुग्णांचे प्रमाण यावर पॉझिटिव्हिटी रेट ठरत आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यातही जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांवर होता तर या आठवड्यातही दहा टक्क्यांपेक्षा जास्त व २० टक्क्यांपेक्षा कमी राहिल्याने तेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या आठवड्यातही चौथ्या स्तरातील निर्बंध कायम राहणार आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सरासरी नऊशेवर कायम राहत असल्याने निर्बंध वाढण्याचेच संकेत होते. त्यानुसार रविवारी सायंकाळी प्रशासनाने आदेश जारी करत आठवडाभर मुदतवाढ दिली आहे.
राज्यात एकीकडे कोरोनाला उतार लागला असताना जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कायम असल्यानेच प्रशासनाने निर्बंध कायम ठेवत केवळ अत्यावश्यक सेवांना दुपारी चारपर्यंत परवानगी दिली आहे तर इतर सर्व दुकाने व सेवा बंद राहणार आहेत.
कोरोना रुग्णसंख्या कायम असतानाच व्यापाऱ्यांकडून दुकाने उघडण्याची मागणी होत होती. विविध व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत दुकाने उघडण्यास परवानग देण्याची मागणीही केली होती. त्यामुळे सोमवारपासून सर्व व्यवहारांना दुपारी चारपर्यंत परवानगी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, निर्बंध कायम राहिल्याने सर्व व्यवहार सुरु होण्याची शक्यता आता मावळली आहे.
कोट
जिल्ह्यात अद्यापही कोरोना रुग्णसंख्या कायम आहे. शिवाय पॉझिटिव्हिटी रेटही दहा टक्क्यांवर असल्याने चौथ्या स्तरातील निर्बंध आठवडाभरासाठी १९ जुलैपर्यंत लागू असणार आहेत.
- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी