लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : हुतात्मा बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असतानाही, यंदा बँक सभासदांना लाभांश वाटप करू शकत नाही. कोरोनामुळे रिझर्व्ह बँकेने बँकांना लाभांश स्व:निधीस वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बँकेला दोन कोटी पावणेचार लाख रुपये नफा असूनही सभासदांना लाभांश वाटप करता येणार नाही. परंतु नफा वाटपाचा विषय आम्ही फेडरेशनकडे लावून धरणार आहे, अशी माहिती हुतात्मा बँकेचे संस्थापक वैभव नायकवडी यांनी दिली.
वाळवा येथे हुतात्मा बँकेच्या २४ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी अध्यक्षस्थानी होते. भगवान पाटील, बाबूराव बोरगावकर, नंदिनी नायकवडी, दिनकर बाबर, बँकेचे कार्यकारी संचालक ए. आर. चौगुले प्रमुख उपस्थित होते.
वैभव नायकवडी म्हणाले, छोट्या बँकेची अवस्था बिकट आहे. बँकेवर आता सहकाराचे नियंत्रण राहिले नसून आरबीआयचे नियंत्रण आहे. आता संचालक मंडळाव्यतिरिक्त, व्यवस्थापक मंडळ असेल. संचालक मंडळाचा एखादा ठराव व्यवस्थापक मंडळास पटला नाही, तर तो पास होणार नाही. शिवाय त्यावर अपीलही करता येणार नाही. भविष्यात सरकारी बँका यासुध्दा खासगीच होणार आहेत. म्हणून हुतात्मा बँकेचे अस्तित्व टिकविण्यासाठी स्माॅल फायनान्स बँकेत रूपांतर करण्याचा ठराव केला व तो सभासदांनी मान्य केला. कोणत्याही बँकेचा सीआरएआर ९ टक्के लागतो. तो हुतात्मा बँकेचा १६.५४ टक्के आहे. इतकी आर्थिक स्थिती भक्कम आहे.
कार्यकारी संचालक ए. आर. चौगुले यांनी स्वागत करून, सभेची नोटीस वाचन केले. रमेश आचरे यांनी ताळेबंद सादर केला. एस. बी. जाधव यांनी अंदाजपत्रक वाचन केले.
चाैकट
एक हजार कोटी व्यवसायाची खंत
हुतात्मा बँकेने ५१० कोटीचा व्यवसाय करून दोन कोटी पावणेचार लाखाचा नफा मिळविला आहे. सतत ऑडिट वर्ग ‘अ’ मिळविला आहे. बँक सर्व पातळीवर सक्षमपणे कारभार करत आहे. तरीही एक हजार कोटीचा व्यवसाय अद्याप बँकेला गाठता आला नाही, अशी खंत वैभव नायकवडी यांनी व्यक्त केली.