सांगली : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर मात करत जिल्ह्यात सध्या कोरोनाचा उतार सुरू असतानाच कोरोना प्रतिबंधक लसीचे आगमन झाले. प्रशासनाने यासाठीही नियोजन करत पहिल्या टप्प्यात २६ हजार ५०० जणांची नोंदणी केली तर ३१ हजार डोस जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले. लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दोन वेळा लसीकरण करण्यात आले असून प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे एकही डोस वाया गेलेला नाही.
जिल्ह्यातील ९ केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू आहे. पहिल्या दिवशी ४५६ जणांना लसीकरण करण्यात आले, तर दुसऱ्या दिवशी आणखी ४३२ जणांना लस देण्यात आली. लसीकरणाच्या नोंदणीपेक्षा लस घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. खासगी डॉक्टरांनी लस घेण्यास तितकी उत्सुकता दाखवली नाही. त्यात लस घेणे ऐच्छिक असल्यानेही तुलनेने प्रमाण कमी आहे. आतापर्यंत ५१ टक्क्यांपर्यंत प्रमाण आहे. मंगळवारी लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी ४३२ डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी लस घेतली होती.
लसीकरण करताना पाळण्यात येणारी नियमावली व इतर काटेकोर नियोजनामुळे एकही डोस वाया गेलेला नाही. जेवढे लसीकरण झाले तेवढेच डोस वापरण्यात आले आहेत.
चौकट
जिल्ह्याला मिळाले डोस ३१५००
पहिल्या दिवशी झालेले लसीकरण ४५६
दुसऱ्या दिवशी झालेले लसीकरण ४३२
एकूण नोंदणी २६ हजार ५००
चौकट
लस घेण्यास घाबरू नका
पहिल्या व दुसऱ्या दिवशी नोंदणीपेक्षा पन्नास टक्के प्रतिसाद मिळाला असला तरी ज्यांनी लस टोचून घेतली त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. लस घेतल्यापासून कोणताही त्रास नाही. त्यामुळे जरूर लसीकरण करून घ्यावे.
लस दिल्यानंतर काहीही त्रास होत नाही. इतर इंजेक्शनप्रमाणेच तिथे टोचले जात असल्याने लस घेण्यास कोणीही घाबरू नये.
चौकट
एका बाटलीत १० डोस
लसीच्या एका बाटलीतून दहा जणांना डोस देता येतो. ही बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते. तसेच डोस भरतानादेखील काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते. साधारण १० टक्के डोस वेस्टेज जातात.