लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. या लढ्यात महापालिकेने कुठलीही आर्थिक तडजोड करू नये. पालिकेच्या अर्थसंकल्पातील निधी कोरोना उपाययोजनांवर खर्च करावा. प्रसंगी शासनाकडूनही महापालिकेला आर्थिक मदत होण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही कृषिराज्य मंत्री विश्वजित कदम यांनी शुक्रवारी दिली.
महापालिकेने कोरोनासंदर्भात केलेल्या उपाययोजना, लसीकरण मोहिमेचा राज्यमंत्री कदम यांनी आढावा घेतला. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील, नगरसेवक अभिजित भोसले, मंगेश चव्हाण, संजय मेंढे, करण जामदार उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी महापालिकेच्या उपाययोजनांची माहिती दिली.
कदम म्हणाले की, महापालिकेने लसीकरणासाठी ३१ केंद्रे सुरू केली आहेत. दररोज २५० ते ३०० व्हाईल्स लसी उपलब्ध होत आहेत. दोन दिवसांत महापालिकेने ५ हजार व्यक्तींचे लसीकरण करून राज्यातच नव्हे, तर देशातच सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविरबाबत आपण स्वत: शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. या महामारीच्या काळात सर्वजण जीव तोंडून काम करीत आहेत.
महापालिकेने १२० बेडचे कोविड सेंटर उभारले आहे. ते शनिवारपासून कार्यरत होईल. शहरातील नागरिकांना अन्नधान्य, भाजीपाल्याचा तुटवडा भासणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची सूचना केल्याचे सांगितले. महापालिकेने कोरोनाच्या लढ्यात कोणतीही आर्थिक तडजोड करू नये. अर्थसंकल्पातील निधी खर्च करावा. शासनाकडूनही महापालिकेला निधी देण्यासाठी आपण पाठपुरावा करीत असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.