सांगली : म्हैसाळ, टेंभू आणि ताकारी योजनांचे वीज बिल भरण्यासाठी ५० कोटींचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला असल्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी सोमवारी जाहीर केले. मात्र मंगळवारी याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी अद्याप निधीच आला नसल्याचे स्पष्ट केले. खा. पाटील आणि अधिकाऱ्यांच्या माहितीमधील मतभिन्नतेमुळे शासनाचे पैसे नक्की कुठे अडकले, असा सवालही शेतकरी उपस्थित करु लागले आहेत.
म्हैसाळ योजना तातडीने सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ५० कोटी रुपये मंजूर केले असून त्यासंबंधीच्या कागदपत्रांवर सहीदेखील झाल्याची माहिती खा. पाटील यांनी सोमवारी दिली. मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर ते म्हणाले की, जिल्ह्यातील म्हैसाळ (२९.६६ कोटी), टेंभू (१७.५ कोटी) आणि ताकारी (३ कोटी) या तिन्ही योजनांची थकबाकी या निधीतून भरली जाणार आहे. विशेषत: थकबाकीमुळे सध्या बंद असलेल्या ‘म्हैसाळ’ची थकबाकी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून तातडीने भरली जाणार असून पाणी सुरू करण्यात येणार आहे.
खा. पाटील यांच्या माहितीनुसार मंगळवारी सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांना शासनाकडून वीज बिल भरण्यासाठी निधी मिळाला आहे का, अशी विचारणा केली. यावेळी शासनाकडून वीज बिल भरण्यासाठी काहीही निधी उपलब्ध झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकºयांकडून पाणीपट्टीची रक्कम वसूल झाली तरच वीज बिल भरणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी केले.
खा. पाटील निधी मंजूर झाला असून तो त्वरित वर्ग होणार असल्याचे सांगत आहेत. अधिकारी मात्र निधी मिळाला नसल्याचे सांगत आहेत. शासनाने थकीत वीज बिल भरण्यासाठी मंजूर केलेला ५० कोटींचा निधी नक्की कुठे अडकला, असा सवालही शेतकरी करू लागले आहेत.
आवर्तनास : वीज थकबाकीचा अडसर...पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही वीज बिल भरण्यासाठी काही निधी मिळाला आहे का, योजना कधी सुरु करणार, याबाबत विचारणा केली. यावेळी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी, अद्याप वीज बिल भरलेले नाही. त्यामुळे म्हैसाळ योजनेचा वीजपुरवठा बंदच आहे. वीज बिल भरल्यानंतरच तो सुरळीत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.