लोकमत न्यूज नेटवर्क, तासगाव: काेकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे नातीचा वाढदिवस साजरा करून दाेन मुली- नातवंडांना घेऊन तासगावला परतत असताना अपघातात आजी- आजाेबांसह ६ जणांचा मृत्यू झाला. एकाच अपघाताने तीन कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तासगाव-मणेराजुरी महामार्गावर चिंचणी हद्दीत मंगळवारी मध्यरात्री चालक असलेल्या आजोबांचा ताबा सुटून कार कालव्यात काेसळली. अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली.
अपघातात राजेंद्र पाटील (५६), सुजाता राजेंद्र पाटील (५२, दाेघेही रा. तासगाव), त्यांची मुलगी प्रियांका खराडे (३३), नात दूर्वा खराडे (५), कार्तिकी खराडे (१, सर्व मूळ रा. बुधगाव, ता. मिरज, सध्या रा. पुणे) आणि राजवी भोसले (३, रा. कोकळे, ता. कवठेमहांकाळ) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची दुसरी मुलगी स्वप्नाली विकास भोसले (३०, रा. कोकळे) ही गंभीर जखमी झाली आहे.
तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे मंगळवारी कुटुंबीयांसमवेत कारमधून कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे आपली लहान मुलगी स्वप्नालीच्या घरी, नात राजवीच्या वाढदिवसासाठी गेले होते. त्यांच्यासोबत पत्नी सुजाता, पुण्याहून सुटीसाठी आलेली मोठी मुलगी प्रियांका आणि तिच्या दोन मुली दूर्वा आणि कार्तिकी हाेत्या. तेथून रात्री उशिरा परतताना हा अपघात झाला.
कारमध्ये अक्षरश: रक्ताचा थारोळा
अपघात मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास झाला. सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. तात्काळ तासगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये स्वप्नाली भोसले जखमी अवस्थेत आढळल्या. रात्रीची वेळ व फारशी वर्दळ नसल्याने अपघातानंतर सहा तासांपर्यंत अपघातग्रस्तांना कोणतीही मदत मिळाली नाही. वेळेत मदत मिळाली असती, तर काही जीव वाचवता आले असते.