सांगली : कोणतीही लाट थोपवता येते, थांबवता येते, कारण त्यांच्याकडे यंत्रणा आणि पैसा आहे. परंतु मराठ्यांची लाट, सामान्य जनतेची लाट कोणाला थांबवता येणार नाही. तिथे ना पैसा चालतो ना यंत्रणा चालते. माझ्यामागे यंत्रणा लावली. देवेंद्र फडणवीसांनी जातीयवादी निरीक्षकाला घरावर नोटीस चिटकावयाला लावली. परंतू अशा कितीही नोटिसा घरावर चिटकवल्या तरी आता मराठ्यांचे आंदोलन थांबणार नाही असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला.सांगलीच्या दौऱ्यावर आलेल्या जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी सकाळी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले, मराठा समाजाचे आरक्षणासाठी गेले १२ महिने शांततेत आंदोलन सुरू आहे. करोडो लोक शांततेत आंदोलन करून तुम्हाला कळणारच नसेल तर मराठ्यांपुढे पर्याय नाही. शेवटी नाईलाजाने मराठा समाजाने निवडणुकीत उभे राहायचे ठरवले तर इतर कोणाची सीट निवडून येणार नाही. मराठा आरक्षणाला विरोध करणारा मग तो कोणत्याही जातीचा असो किंवा कोणीही असो त्याला सुटी देणार नाही. सर्वसामान्यांची लाट आली आहे. त्यांना लढ्यात सहभागी व्हावे असे वाटते. सर्व जातींनी आता त्यांचे नेते आपले नाहीत हे ओळखले आहे. सर्व जाती एकत्र येत असल्याचे तुम्हाला २९ रोजी दिसून येईल. आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही. आमचा कोणता पक्ष नसेल. अपक्ष उमेदवार आमचे असतील. आमच्याकडे मते आहेत आम्हाला कोणत्याही चिन्हाची गरज भासणार नाही.जरांगे-पाटील यांना मराठा समाजातील प्रस्थापित नेते नाराज असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, त्यांच्या नाराजीला मी काही करू शकत नाही. मराठा समाजाची नाराजी आम्हाला दूर करायची आहे. आज पक्षात गट पडलेत तसे त्यांनी मराठ्यांमध्ये ही गट पाडलेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण यांचे जमत नाही असे स्वार्थासाठी सांगितले गेले. परंतु आमचे मराठ्यांचे रक्त एकच आहे. स्वार्थासाठी त्यांनी द्वेष पसरवला आहे. सर्व मराठा एकच आहे. त्यांनी आरक्षण दिले नाहीतर सुपडासाफ होईल. गैरसमज करून राजकारण करण्याचे काम आजवर केले. पक्ष व नेता चालवण्याचे काम केले. काळा पैसा दाबण्यासाठी त्यांना सत्तेत राहावे लागते. परंतु समाज आता हुशार झाला आहे. आता ७५ वर्षांत गरिबांची लाट प्रथम आली आहे. पूर्वीच्या राजकारण्यांना हाकलले पाहिजे असे त्यांना वाटते.
लाट थांबणार नाहीदेवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधताना जरांगे-पाटील म्हणाले, ते आमच्या विरोधात अभियान राबवत आहेत. षडयंत्र, सापळा रचला आहे. आंदोलनावर जाळे टाकले आहे. पाच ते सहा गट केलेत. त्यांच्यामार्फत आंदोलने सुरू आहेत. मराठा समन्वयकांना फोडले, संघटनांना फोडले. परंतु ही लाट आता थांबणार नाही.
डॉक्टरांचा सल्ला धुडकावून दौरासांगलीतील सभेनंतर जरांगे-पाटील यांची तब्येत बिघडली आहे. डॉक्टरांनी सलाईन लावण्याचा सल्ला दिला होता. परंतु तो धुडकावून लावला. सध्या गोळ्या, औषधे घेतली आहेत. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असला तरी कोल्हापूर, सातारा असा पुढील दौराच सुरूच राहील. कितीही त्रास झाला तरी दौरा पूर्ण करणारच असे त्यांनी ठणकावून सांगितले.