लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आयुर्वेदीक डॉक्टरांना ५८ प्रकारच्या शस्त्रक्रियांना परवानगीच्या निमित्ताने आयुष आणि आयएमए संस्था आमनेसामने आल्या आहेत. परवानगीमुळे रुग्णांचे जीव धोक्यात येतील असा आयएमएचा दावा आहे, तर ग्रामिण भागातही शस्त्रक्रिया उपलब्ध होतील असे आयुष संघटनेचे प्रतिउत्तर आहे.
ग्रामिण भागात दर्जेदार शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स उपलब्ध होतील. आरोग्यसेवेचे अधिकाधिक विकेंद्रीकरण होईल असे सांगत आयुर्वेदिक डॉक्टरांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. वर्षानुवर्षे रुग्णसेवा केल्यानंतर तेदेखील पारंगत झाले आहेत, किंबहुना थोट्यामोठ्या शस्त्रक्रिया सध्यादेखील ते करतच आहेत. सरकारच्या परवानगीमुळे त्यांना कायदेशीर पाठींबा मिळाला आहे.
आयएमएने निर्णयाला तीव्र विरोध करताना खिचडीफिकेशन व मिक्सोपॅथी अशी संभावना केली आहे. शिक्षणानंतर अनेक वर्षे पारंगत डॉक्टरांच्या हाताखाली काम केल्यावरच शस्त्रक्रियेत निष्णात होतो, त्यानंतरच निर्दोष शस्त्रक्रिया शक्य होतात. या स्थितीत पुरेसे ज्ञान नसणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेला परवानगी देणे अनाकलनीय आणि धोकादायक असल्याचा आयएमएचा दावा आहे.
ेंद्र सरकारच्या निर्णयाने ग्रामिण भागातील रुग्णांना अधिकाधिक वैद्यकीय सेवा मिळणार आहे. ॲलोपॅथी डॉक्टरांच्या तुलनेत स्वस्तात उपचार मिळतील. त्यामुळे होणारा विरोध योग्य नाही. वर्षानुवर्षे रुग्णसेवा केल्यानंतर आयुर्वेद डॉक्टरही पारंगत झाले आहेत. त्याचा फायदा रुग्णांना मिळेल. तळागाळात रुग्णसेवा पोहोचेल.
- डॉ. सुधीर पाटील
आयुर्वेदिक डॉक्टरांना परवानगीचा विषय नवा नाही. यापूर्वीच कायदा झाला असून आता त्याची अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे आयएमएने नाहक विरोध करु नये. सरकारचा निर्णय आरोग्यसेवेला अधिकाधिक प्रोत्साहन देणारा आहे.शल्य व शालाक्यतंत्र या विषयात आयुर्वेदाचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या ज्ञानावर निष्कारण प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. ही बाब ही अत्यंत निंदनीय आहे. राजपत्राला विरोध करणे निषेधार्ह आहे.
- डॉ. अभिषेक दिवाण
वर्षानुवर्षे सखोल अभ्यास करुन रुग्णांना उत्कृष्ठ सेवा देणाऱ्या ॲलोपॅथी डॉक्टरांवर अन्याय करणारा सरकारी निर्णय आहे. आयुर्वेदीक डॉक्टरांना परवानगीने रुग्णांचे जीव धोक्यात येतील. रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होतील.
- डॉ. श्रीनिकेतन काळे
आयुर्वेदाच्या पदवीधारकांना बीएएमएसप्रमाणे आयुर्वेद शल्यविशारद ही वेगळी पदवी द्यावी. सरकारने मिक्सोपॅथीला प्रोत्साहन देऊ नये. आयुर्वेदाला विरोध नाही, पण वरवरचे शिक्षण रुग्णांसाठी धोकादायक ठरेल.
- डॉ. सीमा पोरवाल
नवीन सरकारच्या निर्णयामुळे आयुर्वेदाला चालना व राजाश्रय मिळेल. देशात शल्यचिकित्सकांचा तुटवडा असलेल्या भागात शस्त्रक्रियेची सेवा मिळेल. महागड्या शस्त्रक्रियांना पऱ्याय म्हणून आयुर्वेदीक डॉक्टरांकडून तुलनेने स्वस्तात शस्त्रक्रिया केल्या जातील. भारतीय आयुर्वेद परंपरेचा सन्मान होईल.
यएमएच्या दाव्यानुसार आयुर्वेदीक डॉक्टरांना शस्त्रक्रियेला परवानगी रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. त्यांना रितसर प्रशिक्षणाची गरज आहे. आधुनिक वैद्यक शास्त्रात शरीरशास्त्राचा सखोल अंगाने विचार केला आहे, पण आयुर्वेद अभ्यासक्रमात कफ, वात, पित्त अशा भिन्न विचारांच्या संकल्पना असल्याचा आयएमएचा दावा आहे. त्यामुळेच विरोध सुरु आहे.