लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोणत्याही स्वयंचलित वाहनाचे हस्तांतरण किंवा मालकाच्या पत्ता बदलासाठी ना हरकत प्रमाणपत्राची गरज नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. तसे सूचनापत्र परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी गुरुवारी जारी केले.
एखाद्या वाहनाच्या परराज्यात हस्तांतरणासाठी किंवा वाहन मालक परराज्यात रहायला गेल्याने पत्ता बदलासाठी उपप्रादेशिक परिवहनचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक ठरते. त्याचबरोबर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहन विक्री झाली तरीही त्यासाठी नमुना क्रमांक २८ मध्ये ना हरकत प्रमाणपत्र मागितले जाते. अनेक ठिकाणी हा नियम सरसकट लावला जात होता. राज्यातील वाहनाचा संगणकीय डेटा सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये एका क्लिकवर उपलब्ध असताना ना हरकत प्रमाणपत्राची मागणी निरर्थक व कागद वाढविणारी ठरत होती. त्यावर खुलासा करताना परिवहन आयुक्तांनी म्हटले आहे की, राज्यांतर्गत हस्तांतरणासाठी हा नियम लागू नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या ४.० या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये ज्या वाहनाचा तपशील उपलब्ध आहे, त्याच्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागू नये. वाहन राज्यभरातील कोणत्याही जिल्ह्यात विकले गेले तरी तेथील परिवहन कार्यालयाच्या संगणकावर त्याचा तपशील उपलब्ध होतो, त्यामुळे वेगळे प्रमाणपत्र आवश्यक ठरत नाही.
चौकट
चेसीस क्रमांकाची खात्री करा
डॉ. ढाकणे यांनी सर्व नोंदणी अधिकाऱ्यांना आदेश दिले की, राज्यांतर्गत पत्ता बदलासाठी नमुना ३३ नुसार अर्ज केल्यास ना हरकत प्रमाणपत्रासाठी अडवणूक करू नये. नमुना २९ व ३० नुसार मालक बदलला तरीही प्रमाणपत्र मागू नये. मात्रए वाहन तेच आहे याच्या खातरजमेसाठी या नमुना फॉर्मवर वाहनाच्या चेसीस क्रमांकाची पेन्सिल प्रिंट चिकटविल्याची खात्री करावी. वाहनावर कर्ज खटला नाही हेदेखील पहावे. परिवहन आयुक्तांच्या या आदेशांमुळे वाहन विक्री व्यवहारातील एक कागद कमी झाला आहे.