स्वप्न पडले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही, अजित पवार यांनी जयंत पाटलांना लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 11:54 AM2024-10-30T11:54:36+5:302024-10-30T11:57:25+5:30

'निवडणुकीत कोणाचा कार्यक्रम करावयाचा आता जनतेने ठरवावे'

No one becomes Chief Minister because of a dream, Ajit Pawar attack on Jayant Patil | स्वप्न पडले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही, अजित पवार यांनी जयंत पाटलांना लगावला टोला

स्वप्न पडले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही, अजित पवार यांनी जयंत पाटलांना लगावला टोला

इस्लामपूर : जास्त जागा निवडून आल्या तरी यांना पक्षाचा मुख्यमंत्री करता आला नाही, असा टोला नामोल्लेख टाळून काकांना मारतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्लामपूरची बारामती करतो म्हणाऱ्यांनो, सात वेळा संधी दिली. पण तुमच्याकडून काही झाले नाही. त्यांना फक्त मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडत आहेत. स्वप्न पडले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही. ते फक्त भूलथापा मारण्यात पटाईत आहेत. माणसातून माणसाला उठविण्याची त्यांची सवय आहे. आता खोटे बोलणाऱ्यांना सुट्टीवर पाठवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात आमदार जयंत पाटील यांच्यावर हल्ला चढवला.

महाराष्ट्रासह जिल्ह्यात ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचा अधिकार कोणालाच नाही. फक्त जनतेलाच आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणाचा कार्यक्रम करावयाचा आता जनतेने ठरवावे, असा टोलाही अजित पवार यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता मारला. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निशिकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते.

ते म्हणाले, महायुतीचे सरकार हे शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचे विचारधारा पुढे घेऊन जाणारे आहे. राज्यातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला देशातील अग्रेसर राज्य बनवण्यासाठी महायुती प्रयत्नशील आहे.आमदार सदाभाऊ खोत, आमदार इद्रीस नायकवडी, सी. बी. पाटील, केदार पाटील, सागर खोत, गौतम पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सत्यजीत देशमुख, भगवानराव साळुंखे, विक्रम पाटील, भीमराव माने, निवास पाटील, अजित पाटील, अक्षय पाटील, सतेज पाटील, अशोक खोत, प्रवीण परीट आदी उपस्थित होत्या. प्रसाद पाटील यांनी आभार मानले.

अन् आर. आर. आबांनी कबुली दिली

अजित पवार यांनी आपल्या भाषणात आर. आर. आबांची आठवण काढली. ते म्हणाले, तब्बल १२ वर्षांपूर्वी इस्लामपुरातच त्यांना तंबाखुजन्य पदार्थ खाऊ नका, असा मी जाहीर सल्ला दिला होता. मात्र तो आबांनी ऐकला नाही. शेवटी रुग्णालयात भेटायला गेल्यावर आबांनी या गोष्टीची आठवण करून देत दादा तुमचा सल्ला ऐकायला हवा होता, अशी कबुली दिली.

Web Title: No one becomes Chief Minister because of a dream, Ajit Pawar attack on Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.