आटपाडी : भारतीय संविधानानेच देशांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक करून हजारो वर्षे प्रस्थापितांच्या गुलामीत असणाऱ्या भारत देशाला स्वाभिमानी बनविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाला देशातील कोणताही राजकीय पक्ष बदलू शकत नाही, असे प्रतिपादन आ. गोपीचंद पडळकर यांनी आटपाडीत फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच आयोजित भारतीय संविधान जनजागृती सप्ताह उद्घाटनप्रसंगी केले.व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, भवानी एज्युकेशन सोसायटीचे रावसाहेब पाटील, अनिल पाटील, नवनीत लोंढे, साहेबराव चवरे, नंदकुमार केंगार, लक्ष्मण मोटे उपस्थित होते.आ. पडळकर म्हणाले की, आटपाडीमध्ये सुरू असणारा संविधान सप्ताह पुढील वर्षांपासून मोठ्या स्वरूपात राबविणार आहे. बहुजनांचे नाव घेऊन अनेक नेत्यांनी स्वत:चा उद्धार करून घेतला आहे. ओबीसी समाजाचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे काम काही मंडळींनी राजकीय द्वेषापोटी केले.देशमुख म्हणाले की, खुल्या गटामध्ये संविधानावर आधारित स्पर्धा घेण्यात यावी. त्यामुळे भारतीय संविधानाबद्दल जनजागृती घडून येण्यास मदत होईल.आंबेवाडीचे सुपुत्र सेवानिवृत्त मेजर महादेव शेलार यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन, तर कौठुळीचे सुपुत्र सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक डी. एस. सावंत यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी स्वागत, प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले. अर्चना काटे यांनी आभार मानले. यावेळी तुषार लोंढे, धनंजय वाघमारे, हनुमंत खिलारी, सुरेश मोटे, रणजित ऐवळे, समाधान ऐवळे, विवेक सावंत, शरद वाघमारे उपस्थित होते.आरक्षणाचे राजकारणमॉरिशस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश कुंभार यांनी ‘ओबीसी आरक्षण आणि भारतीय संविधान’ या विषयावर मार्गदर्शन केले. एका रात्रीमध्ये सरकार बदलता येते, पण राज्यघटना बदलता येत नाही. सर्वच राजकीय पक्षांकडून ओबीसी आरक्षणाचे राजकारण चालू आहे, पण ते पूर्ण क्षमतेने देण्याचा प्रयत्न होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
भारतीय संविधान कोणीच बदलू शकत नाही, गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केले स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 1:57 PM