कवठेमहांकाळ : स्वच्छ सर्वेक्षण व लोकसहभाग असणाऱ्या कामांचे श्रेय कोणत्याही नगरसेवकांनी घेऊ नये. श्रेयवादाचे लावलेले फलक त्वरित काढून टाकावेत, अन्यथा नगरपंचायतच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा नगरपंचायतीचे विरोधी पक्ष नेते विशाल ऊर्फ लाला वाघमारे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
विशाल वाघमारे यांनी याबाबतचे निवेदन नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले की, कवठेमहांकाळ शहरात मेघराजा टेकडी हे छोटेसे पर्यटन स्थळ आहे. या परिसराच्या सुशोभीकरणासाठी शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान मोहिमेंतर्गत तसेच लोकसहभाग अशा माध्यमातून हे स्थळ प्रेक्षणीय करण्यात येत आहे.
परंतु, काही नगरसेवक आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, स्वतःचे राजकीय पोळी भाजण्यासाठी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या ठिकाणी स्वतःच्या नावाचा उल्लेख करून कामाचे श्रेय लाटणारे फलक उभे केले आहेत. हे फलक म्हणजे शहरातील नागरिकांच्या डोळ्यात राजकीय धूळ फेकण्याचा डाव आहे.
परंतु या शहरातील जनता, नागरिक, मतदार हे जागरूक आहेत. त्यांना सगळं समजतं. त्यामुळे हे फलक नगरपंचायतने त्वरित काढावेत, अन्यथा या फलकांना काळे फासून ते काढून टाकू, असा इशाराही वाघमारे यांनी दिला आहे.
या निवेदनावर सविता माने, सिंधुताई गावडे, रुस्तुम शेकडे, विशाल वाघमारे यांच्या सह्या आहेत.