भाजपवासी झालेल्यांकडून काँग्रेसचा राजीनामा नाही! : विधानसभेनंतर पुन्हा चर्चा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 07:18 PM2019-11-14T19:18:33+5:302019-11-14T19:19:34+5:30
दरम्यान, रेड येथे १५ सप्टेंबररोजी काँग्रेसची बैठक झाली होती. त्यामध्ये काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते. यानंतर देशमुख यांनी कोकरूड जिल्हा परिषद सदस्य पदाचाही राजीनामा दिला होता.
विकास शहा
शिराळा : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील काही जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांनी अद्याप पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे हे सदस्य अद्यापही काँग्रेसमध्ये आहेत, की भाजपमध्ये, याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.
गत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. फक्त या तालुक्यात काँग्रेस आघाडी म्हणजे काँग्रेसचे नेते शिवाजीराव देशमुख व राष्टÑवादीचे आमदार मानसिंगराव नाईक गट एकत्र, तर त्यांच्याविरुद्ध भाजपमधून माजी आमदार शिवाजीराव नाईक गट अशी लढत झाली होती. यामध्ये जिल्हा परिषदेच्या चारपैकी प्रत्येकी दोन जागा काँग्रेस व राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या, तर पंचायत समितीच्या आठ जागांपैकी चार राष्ट्रवादी, तीन काँग्रेस व एक जागा भाजपने जिंकली होती.
दरम्यान, रेड येथे १५ सप्टेंबररोजी काँग्रेसची बैठक झाली होती. त्यामध्ये काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते. यानंतर देशमुख यांनी कोकरूड जिल्हा परिषद सदस्य पदाचाही राजीनामा दिला होता. आता या जिल्हा परिषद गटाची निवडणूक घेण्याच्यादृष्टीने शासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. मात्र पणुंब्रे तर्फ वारूण गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शारदा पाटील, पंचायत समितीच्या सभापती माया कांबळे (मांगले), अमर पाटील (बिळाशी), पांडुरंग पाटील (आरळा) हे तीन पंचायत समिती सदस्य काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. त्यांनी मात्र अद्याप राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे हे चौघे अजून काँग्रेसचे की भाजपचे आहेत, याची चर्चा सुरू आहे.
...म्हणून देशमुख यांचा राजीनामा
सत्यजित देशमुख यांना भाजपकडून विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. जर त्यांना काँग्रेसने पक्षातून काढले असते व त्यांच्यावर पक्षीय कारवाई झाली असती, तर त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवता आली नसती. त्यामुळे त्यांनी पदाचा लगेच राजीनामा दिला होता, असे देशमुख गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तिघात लढतीची शक्यता
शिराळा तालुक्यात कोकरूड जिल्हा परिषद गटव २४ ठिकाणी ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होणार आहे. त्यापैकी जिल्हा परिषद निवडणूक भाजपच्या अस्मितेची, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रतिष्ठेची असणार आहे. कोकरूड गट काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने येथे काँग्रेसची उमेदवारी कोणाला, असा प्रश्न आहे. तर सद्यस्थितीत भाजप, राष्ट्रवादी-कॉँग्रेस व महाडिक युवा शक्ती यांच्यात लढतीची शक्यता वर्तविली जात आहे.