शरद जाधव
सांगली : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होऊनही कामकाजाच्या वेळी अनेक जण दांडी मारत आहेत. विजयनगर येथील मध्यवर्ती शासकीय इमारतीत अनेक कार्यालये असून त्यात दुपारनंतर अनेक टेबलवरील कर्मचारी गायब असतात. याबाबत विचारणा केली असता, ते कर्मचारी ‘दौऱ्यावर’ गेल्याचे सांगण्यात आले.
शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवस कामकाजाचे करण्यात आले असूनही अनेकजण कामाऐवजी बाहेरच असतात. याबाबत माहिती घेतली असता, सकाळी येताना अनेकजण उशिरा येतात तर दुपारी बाहेर गेलेले अनेक कर्मचारी दुसऱ्या दिवशीच कार्यालयात येत असल्याचे समजले. अनेक खातेप्रमुखही मुख्यालयात न राहता ते कोल्हापूर, सातारा येथून येत आहेत. यामुळे त्यांचे कार्यालयावर नियंत्रण नसल्याचे दिसत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात काटेकोर पालन
जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र सकाळी साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास सर्व कर्मचारी येतात. बहुतांश जण येतानाच डबा घेऊन येतात. तर जे कर्मचारी बाहेर जातात ते आपल्या वरिष्ठांची परवानगी घेऊनच जात असल्याची माहिती मिळाली. दुपारनंतरही सर्व विभागात कर्मचारी पूर्णवेळ उपस्थित होते.
अधिकाऱ्यांचा दौरा
- मध्यवर्ती शासकीय इमारतीत वीसहून अधिक कार्यालये आहेत. यातील अनेक कार्यालयात कर्मचारी कमी आहेत. ज्या कार्यालयात अधिकारी नव्हते याबाबत चौकशी केली. त्यावेळी ते दौऱ्यावर गेल्याचे सांगण्यात आले.
- काही कर्मचारीही दुपारनंतर ‘क्षेत्र भेटी’साठी गेले होते. यातील अनेक कर्मचाऱ्यांनी याबाबतची कल्पनाही आपल्या सहकाऱ्यांना दिली होती.
कार्यालय सुनेसुने
मध्यवर्ती शासकीय इमारतीतील काही कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्यानेही कार्यालय रिकामे पडले होते. या कार्यालयात एकच कर्मचारी सर्व नियोजन करत होता.
हालचाल रजिस्टर नावालाच
शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कामकाजाच्या वेळेत कार्यालय सोडावयाचे असेल तर त्याची ‘हालचाल’ रजिस्टरमध्ये नोंद आवश्यक असते. मात्र, मध्यवर्ती शासकीय इमारतीमधील हे रजिस्टरचा वापर दिसून आला नाही.
या ठिकाणी नागरिकांचीही गर्दी दिसून आली नाही. बहुतांश कार्यालयातील कर्मचारी स्वत:च कोणाला दुपारनंतर येऊ नका, असे सांगत असल्यानेही ना कर्मचारी ना कोणी नागरिक अशी स्थिती दिसून आली. जे कर्मचारी होते ते आपल्या कामात होते.