ढालगाव : कोण किती कर्तृत्ववान आहे, हे जनतेला निश्चितपणे माहिती आहे. त्यामुळे भविष्यात याचा लेखा-जोखा जनताच करेल. घोडेमैदान आता जवळ आहे. मला लढाई नवी नाही. त्यामुळे लढाईचे आव्हान देण्याची कोणी गरज नाही, असा प्रतिटोला गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विरोधकांना लगावला.ढालगाव, कदमवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे ते बोलत होते. ते म्हणाले, माझ्या राजकारणाची सुरुवात कुठल्या घराण्याचे नाव सांगून झाली नाही, तर स्वत: मैदानात उतरून लढत झालेली आहे. मैदानात उतरून लढण्याचा अनुभव आहे. त्यामुळे राजकारणातील लढाई माझ्यासाठी नवीन नाही.कार्यकर्त्यांना ज्यांनी कट्टरतेचे धडे शिकवले, त्यांनी आपण किती कट्टर आहोत, ते एकदा बघावे. एकदा अपक्ष, एकदा काँग्रेस, एकदा भाजप असा प्रवास करणाऱ्यांनी एक पाय भाजपत, तर दुसरा पाय शिवसेनेत असे धोरण ठेवले आहे, अशी टीका घोरपडे यांचे नाव न घेता केली.ते म्हणाले, मोदींची लाट ओसरली आहे. महागाई का वाढत आहे, याचे उत्तर कोणत्याही भाजप नेत्याकडे नाही. देशातील चार उद्योगपतींचे भले करण्याचे राजकारण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.मी कुठल्या बड्या माणसापुढे मान झुकवून नव्हे, तर गरिबांच्या पायाकडे बघून राजकारण केले. अजून सुरुवात केलेली नाही, तोपर्यंत कोणाला तोंडाची वाफ घालवायची असेल तर घालवू द्या. योग्यवेळी त्यांना पुन्हा उत्तर दिले जाईल. माजी सभापती चंद्रकांत हाक्के, जयसिंगराव शेंडगे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी बांधकाम सभापती दत्ताजीराव पाटील, जि. प. सदस्या राधाबाई हाक्के, भाऊसाहेब पाटील, उपसभापती अनिल शिंदे, जगन्नाथ कोळेकर, वैशाली पाटील, माजी सभापती जालिंदर देसाई, कल्पना पाटील, ताजुद्दीन तांबोळी, प्रशांत शेजाळ, भानुदास पाटील, कुमार पाटील, उपसरपंच अरविंद स्वामी, किसन घार्गे, कुमार पाटील उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले. (वार्ताहर)
लढाई नवीन नसल्याने कुणी आव्हान देण्याची गरज नाही
By admin | Published: July 14, 2014 12:25 AM