सांगली : अंगणवाडीसेविकांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी असहकार आंदोलन गुरुवारपासून सुरु केले. अंगणवाडी कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु झाले. अन्य संघटनांच्या सेविकांनी सहभाग घेतलेला नाही.
सेविकांनी आजपासून मोबाइल वापसी आंदोलनाचा इशारा दिला होता, पण राज्यात अनेक ठिकाणी पाऊस, कोरोना यांचे संकट गंभीर स्वरूपात असल्याने आंदोलन व्यापक स्वरुपात झाले नाही. सर्व प्रकल्पांवर मोबाइल वापसी आंदोलन एकाच दिवशी होणे कठीण असल्याने सोयीनुसार करण्यात आले. परंतु असहकार आंदोलन मात्र सर्वत्र सुरु झाले. मोबाइलवर कोणत्याही प्रकारच्या नोंदी करण्यात आल्या नाहीत. निकृष्ट व वाॅरंटी संपलेले मोबाइल नाकारण्यात आले. आंदोलकांनी सांगितले की, क्षमतेपेक्षा जास्त माहिती भरल्याने ते हँग होत आहेत. दुरुस्तीचा खर्च भरमसाट असून तो सेविकांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे पोषण ट्रॅकर ॲपवर माहिती भरण्याचे थांबविण्यात आले. अनेक सेविकांनी मोबाइल बंद ठेवले.
सांगलीत महिनाअखेरपर्यंत मोर्चाने जाऊन मोबाइल परत केले जाणार आहेत, असे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या निमंत्रक रेखा पाटील यांनी सांगितले.