विटा : महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या अडीच वर्षांत घुसमट होत होती. महाविकास आघाडी सरकार असतानाही विद्यमान लोकप्रतिनिधींना मित्रपक्षांकडून त्रास दिला जात होता. पण, माझे बंड नेतृत्वाविरुद्ध किंवा पक्षाविरोधी अजिबात नाही. माझे बंड शेतकऱ्यांना टेंभू योजनेच्या माध्यमातून शेतीला पाणी मिळावे आणि ही योजना पूर्णत्वास जावी, यासाठी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अनिल बाबर यांनी दिली.
खानापूर मतदार संघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये गेल्याने ते कालपासून नॉट रिचेबल होते. बुधवारी आसाममधील गुवाहाटी येथे गेल्यानंतर ते रिचेबल झाल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
आ. बाबर म्हणाले, अडीच वर्षांत भरपूर त्रास सहन केला. विद्यमान आमदारांचे काही ऐकायचेच नाही, असे ठरवल्यासारखे राजकारण खानापूर मतदार संघात सुरू होते. सत्तेत असलो, नसलो तरी टेंभू योजनेच्या मांडणीपासून आजअखेर गेले दोन ते अडीच तप तत्कालीन सत्तेशी संघर्ष केला. कधी नियोजनाचा अभाव, कधी अनुशेषामुळे निधी मिळण्यात अडचण, कधी तांत्रिक बाबींमुळे योजनेत करावे लागणारे बदल, यामुळे संघर्ष केला. २०१४ ला शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हा सुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनीही, आपल्याला मंत्रीपद देऊ, असे मेळाव्यात जाहीरपणे सांगितले होते. त्यावेळीच आपल्याला मंत्रीपदापेक्षा टेंभू योजनेची पूर्तता करणे, हे आपल्या आयुष्याचे ध्येय आहे, असे स्पष्ट केले होते.
टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याबद्दल प्रयत्न केला. तो टप्पा मंजूर झाला. मात्र, मित्रपक्ष असणाऱ्या स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याच्या मंजुरीचे फलक लावून, फटाके वाजवून, पेढे वाटून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही
महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेणार, यापुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल, असाही प्रचार त्या पक्षाच्या स्थानिक व वरिष्ठ नेत्यांकडून जाहीरपणे सुरू होता. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना बोललो होतो. पण त्यांची म्हणावीशी दखल घेतली गेली नाही, असे बाबर म्हणाले.