सांगली : सासरच्या लोकांकडून अथवा नवऱ्याकडून छळ होत असल्याच्या अनेक तक्रारी महिलांकडून पोलिसात दाखल केल्या जातात. मात्र, आता पुरुषही आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार देत आहेत. पोलीस दलातील भराेसा सेलकडे याबाबतच्या तक्रारी येत असून, त्यांच्याकडून समुपदेशनाद्वारे प्रकरणे मिटवून संसाराची घडी बिघडू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दोन वर्षांपूर्वी कोरोना संसर्गाचा कहर सुरू झाला आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. अनेक जण घरीच राहिल्याने कौटुंबिक वादांचे प्रमाण वाढले. त्यात कोरोनामुळे नोकरी, व्यवसायातही अडचणी आल्याने अनेक घरांत कुरबुरी सुरू झाल्या. याचदरम्यान पत्नीपीडित पुरुषांनीही आपल्या तक्रारी दाखल केल्या आहेत. कक्षाच्या वतीने याबाबत दोघांना बोलावून समुपदेशनासह इतर प्रयत्न केले जात आहेत.
जमली पुन्हा जोडी
- तक्रार प्राप्त झाल्यानंतर महिला कक्षाकडून थेट कारवाईऐवजी समुपदेशनावर भर दिला जातो.
- पोलिसांनी केलेल्या समुपदेशनामुळे माेडण्याच्या उंबरठ्यावर असलेले संसार पुन्हा खुलले आहेत.
मोबाईल ठरतोय कारण
- मोबाईलचा अति वापर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखी वादाचे प्रमुख कारण ठरत आहेत.
- त्यामुळे अनेक तक्रारींमध्ये बायकोच संशय घेत त्रास देत असल्याच्याही तक्रारी आहेत.
भन्नाट कारणांच्या तक्रारी
बायको नेहमी माहेरच्या लोकांनाच बोलावून घेते, माझ्या घरचे कोणी आले की भांडण करते. मोबाईलवर बोलत असलो की वारंवार संशय घेते अशा काही भन्नाट तक्रारी सेलकडे आल्या आहेत.
भरोसा सेलकडे आलेल्या एकूण तक्रारी २७०
तडजोड झालेली प्रकरणे १२१
न्यायालयाकडे वर्ग प्रकरणे ३७