संतोष भिसे - लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोविड काळात रेल्वेने टप्प्याटप्प्याने लांब पल्ल्याच्या काही गाड्या सुरू केल्या. त्यांचे क्रमांक शून्याने सुरू करून कोविड स्पेशल असा विशेष दर्जा दिला. हा दर्जा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरला आहे. प्रवासासाठी नेहमीच्या भाड्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
कोणत्याही प्रवासासाठी किमान १०० किलोमीटरचे भाडे आकारले जात आहे. अर्थात, मिरजेतून एक्स्प्रेसने कोल्हापूरला ५० किलोमीटरच्या प्रवासासाठी ३० रुपये पुरायचे, आता मात्र किमान १०० किलोमीटरचे भाडे आकारले जात आहे. रेल्वेकडून ही लूटच सुरू आहे. विशेष गाडीच्या नावाखाली प्रवाशांच्या सर्व सवलती रद्द केल्या आहेत. फेस्टिव्हल ट्रेनसाठी जवळपास दुप्पट प्रवासभाडे मोजावे लागत आहे. काही मार्गांवर रेल्वेचे भाडे एसटीच्या भाड्यापर्यंत पोहोचले आहे.
बॉक्स
जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष रेल्वे
मिरज-बेंगलुरु राणी चेन्नम्मा, कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया, यशवंतपूर-गांधीधाम, यशवंतपूर-अहमदाबाद, यशवंतपूर-अजमेर, हुबळी-दादर, गोवा-निजामुद्दीन, कोल्हापूर-धनबाद.
बॉक्स
तिकीट दरात अवाजवी वाढ
- लांब पल्ल्याच्या काही गाड्यांचे तिकीट दर १०० ते १२० रुपयांनी वाढले आहेत. कोल्हापूर-निजामुद्दीनसाठी ७३५ रुपये द्यावे लागतात.
- यशवंतपूर-गांधीधाम स्लीपर श्रेणीचा प्रवास ७५० रुपयांवर पोहोचला आहे.
- यशवंतपूर - अजमेर एक्स्प्रेससाठी प्रवास ६५० रुपये, तर कोल्हापूर-धनबादसाठी ९०५ रुपये मोजावे लागतात.
बॉक्स
किमान १००, कमाल ३०० किमीचा फॉर्म्युला
१. फेस्टीव्हल सिझन नसतानाही रेल्वेने किमान १०० किलोमीटर व कमाल ३०० किलोमीटरचा फॉर्म्युला लागू केला आहे.
२. ५० किलोमीटरचा प्रवास करायचा तरी त्यासाठी प्रवाशांना १०० किलोमीटरचे भाडे मोजावे लागत आहे.
कोट
प्रवासी वैतागले
कोरोना काळात कमी झालेला व्यवसाय वाढविण्यासाठी रेल्वेने ही क्लृप्ती केली आहे, त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला नाहक भुर्दंड बसत आहे. दरवाढ करताना दिलेले स्पेशल ट्रेनचे कारण पटणारे नाही.
- उमेश शहा, सांगली रेल डेव्हलपमेंट ग्रुप
रेल्वेच्या मनमानीला एकत्रितपणे विरोध करायला हवा. कोरोना काळात उत्पन्नाची साधने गमावलेल्या सामान्य माणसाची लूट थांबायला हवी. जनरल तिकीट विक्रीही रेल्वेने सुरू केली पाहिजे.
- करण शहा, सांगली रेल डेव्हलपमेंट ग्रुप
स्पेशल ट्रेन सुरू करताना रेल्वेने तब्बल ५३ प्रकारच्या सवलतींना विराम दिला आहे. ज्येष्ठ नागरिक, मुले, पत्रकार, दिव्यांग व दुर्धर आजारी प्रवासी, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्ती या सर्वांच्या प्रवास सवलती काढून घेतल्या आहेत. स्पेशल ट्रेनच्या नावाखाली प्रवाशांच्या किशातून पैसे काढून घेण्याचा हा प्रकार आहे.
- संदीप शिंदे, रेल्वे प्रवासी सेना