संतोष भिसे सांगली : सांगली-कोल्हापूरसह विविध मार्गांवर धावणार्या एसटी गाड्यांमध्ये प्रवासी खचाखच भरले जात आहेत. कोरोनाचा फैलाव वेगाने होत असतानाही एसटीमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन सुरु आहे. त्यामुळे एसटी गाड्या कोरोनाच्या वाहक ठरत आहेत.सांगली आगारातून सुटणार्या महत्वाच्या मार्गांवरील गाड्यांमध्ये प्रवासी दाटीवाटीने प्रवास करत आहेत. परस्परांना खेटून उभ्या राहणार्या प्रवाशांमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भिती आहे. संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे. सक्तीचे लॉकडाऊन लादून लोकांना घरी बसविले आहे. पोटापाण्याचे रोजगार व व्यवसाय बुडवून लोक घरी बसलेत. एसटीला मात्र याच्याशी कोणतेही देणेघेणे नसावे अशी स्थिती आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेत पन्नास टक्के क्षमतेसह वाहतूकीला परवानगी होती. सध्याच्या दुसर्या लाटेत मात्र तसे स्पष्ट आदेश नाहीत. प्रवाशांना उभे राहून प्रवासाला मात्र परवानगी नाही. सांगली आगारातील चित्र नेमके याच्या उलटे आहे. शनिवारी सकाळी ८.५५ वाजता सांगली स्थानकातून कोल्हापुरसाठी सुटलेल्या एसटीमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती.
प्रवाशी परस्परांच्या अंगावर रेलून उभे होते. अशाच गर्दीत वाहक तिकिटे देण्याचे काम करत होता. प्रवाशांनी मास्क लावले असले तरी सोशल डिस्टन्सींगचा पत्ता नव्हता. इचलकरंजी, सोलापूर या मार्गांवरील गाड्यांमध्येही प्रवासी दाटीवाटीने प्रवास करत असल्याचे चित्र आहे. अतिरिक्त प्रवाशांना रोखण्याची जबाबदारी वाहकाची आहे, पण उत्पन्नाच्या नावाखाली त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. काही सजग प्रवाशांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.प्रवाशांची वाहकावरच दादागिरीएसटीच्या अधिकार्यांनी दावा केली की, सांगली-कोल्हापूर व सांगली-इचलकरंजी मार्गांवर गाड्यांची संख्या कमी केली आहे. यापूर्वी पाच-दहा मिनिटांना गाडी सुटायची, सध्या अर्ध्या तासांना एक गाडी सोडली जाते, त्यामुळे प्रवाशांची गर्दी होत आहे. ते वाहकाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. वाहकावरच दादागिरी करतात. दरम्यान, गर्दी टाळण्यासाठी गाड्यांची संख्या वाढविण्याची मानसिकता अधिकार्यांत दिसत नाही.