शिराळा : मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे सर्वसामान्य माणसावर केलेले सर्जिकल स्ट्राईक आहे. या निर्णयाने जनताच पिचली असून, विजय मल्ल्यासारखे मोठे उद्योजक यामध्ये सहीसलामत सुटले. त्यामुळे उद्योगपतींना साथ देणाऱ्या भाजपला नाकारून काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन प्रदेश काँंग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले. मणदूर (ता. शिराळा) येथे काँग्रेस व राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख उपस्थित होते. देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांची अवहेलना करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. अनेक अपेक्षा ठेवून जनतेने भाजपला निवडून दिले, पण जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. मानसिंगराव नाईक म्हणाले, समाजमान्यता मिळाल्याने गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये लोकांना अपेक्षित विकास झाला. या विभागामध्ये मी आमदार असताना अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावली आहेत. या जोरावरच आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. शिवाजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विजयश्री खेचून आणू, विरोधकांना एकही जागा मिळणार नाही.यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील, अॅड. भगतसिंग नाईक, गोविंदराव माने, संभाजी पाटील, शिवाजी चौगुले, नाना पाटील, मोहन पाटील, राम माने, कैलास पाटील, यशवंत पाटील, शिवाजी जाधव, शिवाजी पाटील, विष्णू पाटील, वसंत कांबळे, रामचंद्र मिरुखे, मारुती मिरुखे, ज्योती मिरुखे, किसन कंदारे, तानाजी वरपे, किसन मिरुखे, पांडुरंग कोळेखर, तुकाराम गावडे उपस्थित होते. (वार्ताहर)
नोटाबंदी निर्णयाने सर्वसामान्य त्रस्त
By admin | Published: February 18, 2017 12:04 AM