ओळ : मरळनाथपूर (ता. वाळवा) येथील विश्वजित खाेत या युवकाने पन्हाळा ते मरळनाथपूर धावत शिवज्याेत गावात आणली.
मानाजी धुमाळ
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेठरे धरण : शिवजयंतीच्या निमित्ताने मरळनाथपूर (ता. वाळवा) येथील सामान्य कुटुंबातील अठरा वर्षीय युवक विश्वजित अर्जुन खोत याने पन्हाळगड ते मरळनाथपूर हे सुमारे ४५ किलोमीटरचे अंतर एकट्याने पाच तास धावत गावात शिवज्योत घेऊन येण्याचा पराक्रम केला. यावेळी त्याच्यासह युवकांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रात गडकिल्ले बांधून स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पगडा युवकांच्या मनावर पडला. त्यांच्या पराक्रमाचा मनात चंग बांधून गेल्या वर्षांपासून विश्वजित खोत हा शिवजयंतीच्या निमित्ताने पन्हाळगड येथून अखंडपणे धावत, न थांबता शिवज्योत घेऊन येण्याचा पराक्रम करत आहे. मरळनाथपूर येथील राजे ग्रुपच्या दहा ते बारा मावळ्यांसह विश्वजित याने शुक्रवारी रात्री पन्हाळगड येथे जाऊन तेथील शिवरायांच्या मंदिरातील मूर्तीचे दर्शन घेतले. त्याठिकाणी शिवज्योत प्रज्वलित करून पहाटे चार वाजता सर्वजण निघाले. ज्योत घेऊन धावत पन्हाळगड, वाघबीळ, ते वारणानगरमार्गे चिकुर्डे, ऐतवडे बुद्रुक मार्गे सकाळी आठ वाजता शिवज्योत घेऊन विश्वजित खोत यांच्यासह युवक मरळनाथपूरला परतले.
गावात युवक व आबालवृद्धांनी या शिवज्योतीचे स्वागत करून विश्वजित व शिवज्याेतीची गावातून ढोलच्या निनादात मिरवणूक काढली. शनिवारी सायंकाळी राजे ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांचा प्रेरणामंत्र म्हणून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. अजय सांडगे, शुभम सांडगे, दत्तात्रय डंगारणे, सतीश खोत, किशोर शिंदे, साजन खोत, विवेक माने, गौरव डंगारणे, सूरज खोत, गणेश खोत, तन्मय खोत हे यावेळी उपस्थित होते.