सांगली : महापालिकेने क्षेत्रसभा न घेतल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तानाजी रुईकर व वि.द.बर्वे यांनी आयुक्त व नगरसेवकांसह ८२ जणांना दावापूर्व नोटीस बजावली आहे. याबद्दल आयुक्तांनी आपली जबाबदारी पार पाडलेली नाही, तसेच याबद्दल सर्व नगरसेवकांचे पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी या नोटिशीद्वारे केलेली आहे.
नोटिशीत म्हटले आहे की, निवडून आल्यानंतर या नगरसेवकांनी दोन वर्षे उलटली, तरी क्षेत्रसभा घेतलेल्या नाहीत. या कालावधीत किमान चार सभा व्हायला हव्या होत्या. त्या न झाल्याने महापालिका कायदा कलम २९ क नुसार कायदेशीर प्रक्रिया पार पाडून, सर्व नगरसेवकांचे पद अर्नह (रद्द) करण्यासाठी आयुक्तांनी कार्यवाही करायला हवी होती. ती केलेली नाही. त्यामुळे जिल्हा न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात येणार आहे.
यापूर्वी जिल्हा सुधार समितीने क्षेत्रसभांसाठी व्यापक आग्रह धरला होता. तीन वर्षांपूर्वी काँग्रेस सत्ताकाळात अखेरच्या काळात क्षेत्रसभा झाल्या होत्या. मात्र, निवडणुकानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या, असा प्रकार घडला होता. नागरिकांना आपल्या प्रभागातील समस्यांबाबत प्रशासकीय यंत्रणांना जाब विचारण्याची व्यापक संधी या कायद्याने दिली आहे. प्रशासन या नोटिशीवर कोणते उत्तर देते, याकडे आता लक्ष लागले आहे.
....
ReplyForward