सांगली : सहकार कायद्यातील नव्या बदलानुसार अपात्र ठरलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सात संचालकांना येत्या दोन दिवसात नोटिसा बजाविल्या जाण्याची चिन्हे आहेत. त्याबाबतची प्रशासकीय तयारी सुरू असल्याची माहिती विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी सोमवारी दिली. गेल्या दहा वर्षात गैरकारभारामुळे बरखास्तीची कारवाई झालेल्या जिल्हा बँका व नागरी बँकांवरील संचालकांना दहा वर्षे निवडणूक बंदी घालण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यामुळे यासंदर्भातील वटहुकूम लागू झाला आहे. त्यामुळे २०१२ मध्ये बरखास्त झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाला दहा वर्षे अपात्र ठरविण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विलासराव शिंंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, प्रा. सिकंदर जमादार, माजी अध्यक्ष बी. के. पाटील, माजी उपाध्यक्ष महेंद्र लाड या विद्यमान संचालकांचा समावेश आहे. शासनाने शुक्रवारी यासंदर्भातील अध्यादेश लागू केल्यानंतर सोमवारी सहनिबंधकांमार्फत नोटिसा बजावण्याची शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात सोमवारी नोटिसा बजावण्यात आल्या नाहीत. याबाबत दराडे म्हणाले की, येत्या दोन दिवसात याबाबतच्या नोटिसा बजावण्यात येतील. अध्यादेशानुसार प्रशासकीय तयारी सुरू आहे. त्यामुळे विभागीय सहनिबंधकांच्या या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा बँक संचालकांना दोन दिवसात नोटिसा
By admin | Published: January 26, 2016 12:59 AM