सांगली : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी प्रशासनाने तिहेरी हल्ला सुरू ठेवला आहे. निलंबन आणि बडतर्फीसोबतच लाखो रुपये दंडाच्या नोटिसाही काही कर्मचाऱ्यांना पाठविल्या जात आहेत.दंडाच्या नोटिसांमुळे कर्मचारी हबकले आहेत. आंदोलक कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले. खुद्द आगार व्यवस्थापक कर्मचाऱ्यांच्या घरोघरी गेले. स्थानिक सरपंच, पोलीस पाटील यांची मध्यस्थी करून कर्मचाऱ्यांचा होकार मिळविण्याचा प्रयत्न केला.यातून बरेच कर्मचारी रुजूही झाले; पण इतक्या खटपटीनंतरही रुजू न होणाऱ्या व संपावर ठाम असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडुका उगारण्यात येत आहे. निलंबन कारवाईनंतर सध्या बडतर्फीचे सत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत एकूण ५४९ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामावरून काढले आहे.या कारवाईनंतरही मोठ्या संख्येने कर्मचारी संपात कायम आहेत. या कर्मचाऱ्यांना सरासरी दीड ते दोन लाख रुपये दंडाच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. बेकायदा संप करून एसटीचे नुकसान केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जात आहे. नियमबाह्य आंदोलन करून एसटीच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे.बडतर्फ झालेल्यांचे काय?दरम्यान, निलंबनाची कारवाई झालेले कर्मचारी ड्युटीवर हजर झाले, तरी पुढील त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई सुरूच राहणार आहे. चौकशी, वेतनवाढ रोखणे, बदली अशा कारवाया केल्या जाऊ शकतात. बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांची मात्र कोंडी झाली आहे.नोकरीत पुन्हा रुजू व्हायचे असेल, तर त्यांना एसटीच्या जिल्हास्तरीय समितीसमोर हजर व्हावे लागेल. तेथील सुनावणीनंतर जिल्हा समितीच निर्णय घेईल. अर्थात, संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया राबवूनच बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे सुनावणीमध्ये काहीही निष्पन्न होणार नाही असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ST Strike: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना लाखोंच्या दंडाच्या नोटिसा, बेधडक कारवाईमुळे कर्मचारी हबकले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 12:45 PM