लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेत महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून विरोधी उमेदवारांना मतदान करणाऱ्या व तटस्थ राहणाऱ्या सात नगरसेवकांवरील कारवाईची प्रक्रिया भाजपने सुरू केली आहे. त्यांच्या नोटिसा रविवारी तयार केल्या असून आज, सोमवारी त्यांना त्या बजावल्या जाणार आहेत. म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देऊन कारवाई होईल, असे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी सांगितले.
महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही सत्ताधारी भाजपला महापौर, उपमहापौर निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. भाजपची सात मते फुटल्याने अधिकृत उमेदवार धीरज सूर्यवंशी व गजानन मगदूम यांना पराभव पत्करावा लागला. भाजपचे नगरसेवक आनंदा देवमाने व शिवाजी दुर्वे हे दोघे मतदानास गैरहजर राहिले, तर स्नेहल सावंत, महेंद्र सावंत, नसीमा नाईक, अर्पणा कदम व विजय घाटगे या पाच नगरसेवकांनी उघडपणे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान केले.
भाजपने पुणे व मुबंई येथील तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेतला आहे. रविवारी त्यानुसार नोटिसा तयार करण्यात आल्या. सातही नगरसेवकांना सोमवारी नोटिसा बजावण्यात येणार आहेत. पक्षादेश डावलून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना का मतदान केले? याप्रकरणी त्यांना नियमानुसार अपात्र का करू नये ? दीपक शिंदे व महापालिकेतील भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांच्या सहीने नोटिसा तयार केल्या आहेत.
चौकट
आघाडीकडून बळ
भाजपच्या त्या सातही नगरसेवकांना काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने बळ दिले आहे. कायदेशीर लढाईत त्यांना आघाडीमार्फत ताकद पुरविली जाणार आहे. रविवारी आघाडीच्या नेत्यांनीही वकिलांशी चर्चा केली.