कडेगाव :
वीज बिल न भरल्याने महावितरणने तडसर (ता. कडेगाव) येथील पथदिवे आणि
पाणीपुरवठा विहिरीचे कनेक्शन तोडून ग्रामपंचायतीकडे ७२ लाखांच्या बिलाची मागणी केली. मग ग्रामपंचायतीनेही महवितरणला ८९ लाख रुपये भरण्याचे फर्मान सोडले आणि ‘बत्ती गुल’ झालेले गावातील रस्ते पुन्हा प्रकाशमान झाले.
तडसरला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारीचे सात लाखांचे आणि खांबांचे वीज बिल ६५ लाख असे ७२ लाख थकीत होते. महावितरणने गावचे पथदिवे बंद केले. सुमारे नऊ हजार लोकवस्तीचे गाव तीन दिवस रस्त्यावरील दिवे व पाण्याविना दिवस काढत होते.
वास्तविक सार्वजनिक गावठाणमधील विद्युत खांबाचे व गाव पाणीपुरवठ्याचे बिल जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून २५ टक्के रक्कम परस्पर कपात करून महावितरणला भरत असते.
सरपंच हणमंतराव पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पवार यांनी महावितरण कंपनीस विनंती करूनही अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा पूर्ववत जोडला नाही. शेवटी सरपंच संघटनेशी ग्रामपंचायतीने चर्चा केली. महावितरणला गावात असलेले वीज खांबांचे, शेतात उभारण्यात आलेल्या खांबांचे दोन वर्षांचे भाड्याचे ८९ लाख येणेबाकीची नोटीस काढून ती रक्कम तात्काळ भरण्याची सूचना केली. यानंतर महावितरणला खडबडून जाग आली आणि गावचा वीज पुरवठा सुरळीत केला.