सांगली : राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेकडून बुधवारी ७०० सेविकांना नोटिसा बजावल्या आहेत. या कारवाईनंतर १७० अंगणवाड्या चालू झाल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाच्या कारवाईमुळे नव्याने सेवेत दाखल झालेल्या सेविकांनी संपातून माघारी घेऊन अंगणवाड्या चालू केल्या आहेत.जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी ४ डिसेंबरपासून संप पुकारला आहे. या संपामुळे जिल्ह्यातील दोन हजार ६४७ सेविका आणि दोन हजार ६४७ मदतनीस असे एकूण चार हजार ८९८ कर्मचारी संपावर आहेत. या संपामुळे ६२ हजार बालके आणि गरोदर मातांच्या आहाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. म्हणून शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीसांवर कारवाई करून अंगणवाड्या चालू करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील ७०० सेविकांना नोटिसा बजावल्या आहेत.या कारवाईच्या भीतीने जिल्ह्यातील १७० सेविका व मदतनीसांनी अंगणवाड्यांचे कामकाज बुधवारी चालू केले आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी दिली. तसेच गुरुवारी जवळपास ३०० अंगणवाड्यांचे कामकाज चालू होईल, असा विश्वासही यादव यांनी व्यक्त केला आहे.
नियुक्ती मिळेपर्यंत संप सुरूजिल्ह्यात नव्याने जवळपास ५०० अंगणवाडी सेविकांची जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून नियुक्तीची प्रक्रिया झाली आहे. यामधील काही सेविकांना हजर होऊन सहा महिन्याचा कालावधी झाला आहे. तसेच काही सेविका हजर झाल्यानंतर लगेच संपावर जावे लागले आहे. या सेविकांना प्रशासनाकडून कारवाई होऊन नोकरी जाण्याची भीती वाटत आहे. म्हणून अनेक सेविका बुधवारी कामावर हजर झाल्या आहेत.