सांगली : सांगली मार्केट यार्डातील व्यापार वाढावा, या प्रमुख हेतूने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी अत्यल्प भाड्याने जागा दिल्या होत्या. २०२३ पर्यंत केवळ पाच हजार क्वेअर फुटाच्या जागेला वार्षिक दोन हजार रुपये भाडे होते. बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी एक लाख २५ हजार रुपये भाडेवाढ निश्चित केली आहे. सध्या बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना वाढीव भाड्याची नोटीस पाठविल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.वसंतदादा पाटील यांनी सांगली मार्केट यार्डात व्यापार सुरू करून नवीन पेठ विकसित केली. यावेळी व्यापाऱ्यांना नाममात्र भाड्याने म्हणजे वार्षिक २५१ रुपयांनी पाच हजार क्वेअर फुटाची जागा दिली होती. यानुसार जवळपास २००८ पर्यंत भाडे आकारणी होत होती. २००९-१० ते डिसेंबर २०२३ पर्यंत वार्षिक दोन हजार रुपये भाडे होते. जानेवारी २०२४ पासून वार्षिक दोन हजार असणारे भाडे एक लाख २५ हजार रुपयांपर्यंत गेले आहे. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार व्यापार वाढविण्यासाठी आणि मार्केट यार्डातील मूलभूत सुविधांकडेही संचालक मंडळाने लक्ष दिले पाहिजे.प्रशासकांनी मार्केट यार्डातील मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याऐवजी वार्षिक दोन हजार रुपयांवरून एक लाख २५ हजार रुपये भाडेवाढ करणे योग्य नाही. प्रशासकांच्या या भूमिकेवर व्यापाऱ्यांमधून सध्या नाराजी आहे. विद्यमान संचालक मंडळाने प्रशासकांच्या भाडेवाढीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या भाड्यावर काय तोडगा काढावा, याबाबत व्यापारी आणि संचालक मंडळांत चार बैठका झाल्या आहेत; पण अद्याप काहीच निर्णय झाला नाही.
अशी झाली भाडेवाढकोरोना कालावधीमध्ये म्हणजे २०२२ एप्रिल २०२२ ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत सांगली बाजार समितीवर प्रशासक होते. या कालावधीत प्रशासक तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी रेडी रेकनर दराने भाडे निश्चितीची सूचना दिली होती. त्यानुसार पाच हजार क्वेअर फुटांच्या जागेचे वार्षिक भाडे एक लाख ७५ हजार रुपये होणार होते. पण, ही भाडेवाढ खूपच होत असल्यामुळे बाजार समितीच्या अभियंत्यांना भाडेनिश्चितीची सूचना दिली. त्यानुसार अभियंत्यांनी सर्व गोष्टींचा विचार करुन एक लाख २५ हजार रुपये वार्षिक भाडे निश्चित केली होती.
व्यापाऱ्यांचा विचार करूनच भाडेवाढ : सुजय शिंदेसांगली मार्केट यार्डातील व्यापार वाढला पाहिजे आणि बाजार समितीचा कारभारही चांगला चालला पाहिजे. या सर्व गोष्टींचा विचार करून भाडेवाढ निश्चित करण्यात येणार आहे. भाडेवाढीच्या प्रश्नावर व्यापारी आणि बाजार समिती संचालक मंडळ, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासोबत गुरुवारी बैठक झाली आहे. या बैठकीत काही तोडगा निघाला नाही. पण, पुन्हा बैठक घेऊन भाडेवाढीवर योग्य तोडगा काढला जाईल, असा विश्वास सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी व्यक्त केला.
व्यापार वाढला पाहिजे : अमरसिंह देसाई
सांगली बाजार समितीवर प्रशासक असताना त्यांनी सांगली मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांच्या भाड्यामध्ये दोन हजार रुपयांवरून ६४ पटीने वाढ करून एक लाख २५ हजार रुपये केले आहे. व्यापार जेमतेम चालत असताना अशा पद्धतीने भाडेवाढ करणे योग्य नाही. बाजार समिती संचालक मंडळाकडे भाड्याबाबत योग्य ताेडगा काढण्याची विनंती केली आहे. संचालकांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई यांनी दिली.