इस्लामपूर : शहरातील वर्षानुवर्षे घरपट्टी कराची थकबाकी केलेल्या जवळपास ३७६ मालमत्ता धारकांविरुध्द पालिका प्रशासन आता न्यायालयीन कारवाईचा बडगा उगारण्याच्या तयारीत आहे. ८९ लाख रुपये थकित घरपट्टी वसुलीसाठी ही कारवाई करण्यापूर्वी ११ जुलैला न्यायालयात होणाऱ्या लोकअदालतीमध्ये या मालमत्ताधारकांना तडजोडीची संधी दिली जाणार आहे. पालिकेच्या या पवित्र्याने मालमत्ताधारक धास्तावले आहेत.पालिकेच्या कर वसुली विभागाने गेल्या १० ते १५ वर्षांपासून घरपट्टी थकवणाऱ्या मालमत्ताधारकांची यादी काढली आहे. यामध्ये व्यक्तिगत मालमत्ताधारकांसह काही संस्थांचाही समावेश आहे. या सर्वांविरुध्द पालिका प्रशासनाने नगरपालिका अधिनियमातील सर्व कायदेशीर तरतुदींचा वापर वारंवार केला. त्यानंतर अगदी जप्तीपर्यंतच्या नोटिसा दिल्या आहेत. मात्र या मालमत्ताधारकांचा हत्ती जागेवरून न हलल्याने आता शेवटची कारवाई म्हणून पालिकेने न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करण्याची तयारी चालवली आहे.लोकअदालतीत तडजोडीची संधी दिल्याने न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यावर मालमत्ताधारकांना पालिकेने आम्हाला म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही, असा बचाव करता येणार नाही. न्यायालय देईल तो निर्णय मान्य करण्यावाचून पर्याय राहणार नाही. पालिकेच्या या कारवाईने थकित मालमत्ताधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)या कारवाईबाबत मालमत्ताधारकांनी कसलीही भीती बाळगू नये. वर्षानुवर्षे थकित असलेली घरपट्टी वसूल करण्याची ही नियमित प्रक्रिया आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तडजोडीची संधी देत आहोत. तडजोडीसाठी येणाऱ्या मालमत्ताधारकांना सुलभ हप्ते ठरवून दिले जातील. कोणालाही त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊ. पुढील टप्प्यात पाणीपट्टी, गाळेधारकांची थकबाकी वसूल करणार आहे.- नीलेश देशमुख, मुख्याधिकारी, तडजोडीची संधीशहरातील मालमत्ता कराची थकबाकी ही ८८ लाख ४२ हजार रुपये इतकी आहे. यासह पाणीपट्टी, शॉपिंग कॉम्प्लेक्समधील व्यापारी गाळ्यांची मिळून एकूण थकबाकी १ कोटी २५ लाखांच्या आसपास आहे. आता पहिल्या टप्प्यात ३७६ मालमत्ताधारकांना ११ तारखेला होणाऱ्या लोकअदालतीमध्ये येऊन थकित कराच्या समायोजनासाठी तडजोड करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
८९ लाखांच्या करवसुलीसाठी नोटिसा
By admin | Published: July 08, 2015 11:55 PM