सांगली : महापालिकेत पुरेसे बहुमत असतानाही तोंडघशी पडलेल्या भाजपला आता जिल्हा परिषदेत ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. महापौर निवडीनंतर जिल्हा परिषदेसाठी बैठक घेण्याचे सूतावोच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. मात्र, तेथेही राष्ट्रवादीकडून ‘करेक्ट कार्यक्रम’ होऊ नये, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेतील बदलासाठी सदस्य आक्रमक आहेत. गेल्या आठवड्यातील बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्याकडे बदलासाठी साकडे घालण्यात आले होते. ‘ठंडा करके खाओ’ भूमिका घेत पाटील यांनी तत्काळ निर्णय जाहीर केला नाही. महापौर बदलानंतर गुरुवारी (दि. २५) जिल्हा परिषदेसाठी बैठक घेण्याचे आश्वासन दिले. महापालिकेत सत्ता हातची गेल्याने आता जिल्हा परिषदेत अत्यंत सावध हालचाली कराव्या लागणार आहेत.
जिल्हा परिषदेत भाजपकडे महापालिकेप्रमाणे स्पष्ट बहुमत नाही. शिवसेना, रयत आघाडी व घोरपडे गटासह जुगाड बनवून सत्तेवर पक्ष आरूढ झाला आहे. महापालिकेत जयंत पाटील यांनी सत्तांतर घडवून आणल्याने जिल्हा परिषदेतील असंतुष्टांच्या आकांक्षांना धुमारे फुटले आहेत, त्यांचा भाव वधारला आहे.
पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ वर्षभरच राहिल्याने बदलासाठी सारेच आग्रही आहेत. त्याला चंद्रकांत पाटील यांनी मान डोलावली नाही तर सदस्य पक्षादेशाकडे पाठ फिरवू शकतात.
चौकट
जिल्हा परिषद सदस्यही गोव्याला जाणार?
आता जिल्हा परिषदेच्या सदस्यांना विश्वासात घेऊनच चंद्रकांत पाटील यांना बदलासाठी पावले टाकावी लागतील. अध्यक्ष-उपाध्यक्षांसह सर्व पदाधिकारी बदलाची सदस्यांची मागणी आहे. अध्यक्षपदासाठी आरगच्या सदस्या सरिता कोरबू आग्रही आहेत. गेल्या वेळी त्यांना थांबण्यास सांगितले होते. गेल्या पंधरवड्यात त्यांनी दीड डझन सदस्यांच्या पाठबळाचे खलिते घेऊन दादांपुढे दावा मांडला होता. सभापती बदलासाठी अशीच मांडणी झाली आहे. ती नाकारल्यास ‘करेक्ट कार्यक्रमा’साठी जिल्हा परिषदेचे सदस्यही गोव्याला जाण्याचा धोका आहे.
चौकट
असे आहे संख्याबळ
भाजप - २६, राष्ट्रवादी - १४, काँग्रेस - ८, रयत आघाडी - ४, शिवसेना - ३, घोरपडे गट - २, स्वाभिमानी शेतकरी संघटना - १