विटा (जि. सांगली) : सांगली जिल्ह्यातील भाळवणी (ता. खानापूर) येथे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या रूस्तुम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीवेळी पहिल्या क्रमांकाचे बक्षीस कऱ्हाडच्या ‘महिब्या’ आणि पुण्याच्या ‘बकासूर’ या बैलजोडीने जिंकले होते. त्यांना प्रत्येकी एक अशा दोन ‘थार’ गाड्या देण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. यामुळे दोन्ही बैलमालकांना ‘थार’ मिळणार आहे.
भाळवणी येथे दि. ९ एप्रिल रोजी बैलगाडी स्पर्धेचे आयोजन केले होते. या शर्यतीत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस ‘थार’ गाडी होती. यावेळी रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील सदाशिव मास्तर यांच्या महिब्या आणि मावळ (पुणे) येथील मोहित धुमाळ यांच्या बकासूर या बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावला होता.
मात्र, मालक दोन आणि बक्षिसाची ‘थार’ गाडी एकच असल्याने गाडी कोणी घ्यायची याबाबत एकमत होत नव्हते. हा विषय चंद्रहार पाटील यांच्यापर्यंत आला. त्यावेळी त्यांनी ‘बक्षीस बकासूरला द्यावे’, असे सांगितले. मात्र, महिब्याचे मालक सदा मास्तर यांनी ‘मी महिब्याला काय सांगू?’ असा भावनिक सवाल पाटील यांना केला. त्यामुळे तेही निरुत्तर झाले. अखेर पाटील यांनी मोठेपणा दाखवत महिब्या आणि बकासूर या दोघांनाही थार देण्याचा निर्णय घेतला. डबल महाराष्ट्र केसरीच्या या डबल धमाक्याची राज्यात चर्चा सुरू आहे.पैशापेक्षा आठवण लाखमोलाचीबैलगाडी शर्यतीत मिळालेल्या ‘थार’वर महिब्या आणि बकासूर या दोघांच्याही मालकांनी हक्क सांगितला. पैसे देतो, पण बक्षिसाची गाडी मलाच द्या, असा आग्रह धरला. पण पैशापेक्षा बैलांची आठवण लाखमोलाची असल्याने त्यांच्यातील मतभेद मिटत नव्हते. आयोजकांनी दोघांनाही दोन ‘थार’ देऊन यावर तोडगा काढला.