आटपाडी : आपण सगळ्यांना मित्र समझतो, पण प्रत्येक मित्र जर आपल्याला विरोधकच समजत असतील, तर आपण मैत्री कुणाबरोबर करायची? आपली सगळ्यांबरोबर मैत्री करून झालीय. त्यापेक्षा आपण एकटेच लढलो तर चांगले होणार आहे. बाकीच्यांनी औपचारिक बोलले तरी चालेल; पण मला आता तसे बोलून चालणार नाही, असे सांगून माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी येणाऱ्या जि. प. आणि पं. स. च्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय गटाशी युती होणार नसल्याचे भाष्य केले आणि चर्चांना पूर्णविराम दिला. निमित्त होते येथील आदर्श गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या आदर्श को-आॅप. क्रेडिट सोसायटीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे. या कार्यक्रमासाठी राजेंद्रअण्णा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि जिल्हा बॅँकेचे संचालक उदयसिंह ऊर्फ संजूकाका देशमुख हे सख्खे बंधू प्रथमच एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. गेली काही वर्षे देशमुख गटाने अनेक निवडणुका विविध राजकीय गटांशी युती करून लढविल्या; पण विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून ही मंडळी आता ताकसुध्दा फुंकून पिऊ लागल्याचे चित्र आहे. एरवी निवडणुकीच्या प्रचार सभांमध्येच राजकीय भाष्य करणाऱ्या देशमुख बंधूंनी सोमवारी जाहीरपणे भूमिका मांडली. कल्लेश्वर मंदिराच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. अमरसिंह देशमुख म्हणाले, तरुणांच्या नावाने सर्वत्र ओरड ऐकायला मिळत असताना, तरुण गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आधी व्यायामशाळा बांधून आता पतसंस्था काढून आदर्श निर्माण केला आहे. तालुक्याबाहेरील पतसंस्था येथे येऊन व्यवसाय करत आहेत. त्या कोणत्या पध्दतीने हे सांगण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत लोकांच्या पैशाची काळजी घेण्यासाठी संस्था निर्माण केलेल्या या तरुणांचे कार्य कौतुकास्पद आहे; पण संस्था चालवताना त्यात राजकारण नको. मी गेली सात वर्षे राज्यातील आदर्श बॅँकेचा पुरस्कार घेतोय, पण त्याचे गेल्या विधानसभा निवडणुकीत मला ‘बक्षीस’ मिळाले. राजेंद्रअण्णा यावर म्हणाले, मोठे काम करूनही निवडणुकीत का मते दिली नाहीत, असे न म्हणता, नाराज न होता दररोज नव्या उमेदीने लोकांसमोर जातोय. अमरसिंह यांनी अभिमान वाटावा असेच काम केले आहे. मीसुध्दा त्यांच्याकडून शिकतोय. मित्रांनो, आधी संसार नेटका करा, मग राजकारण करा. सगळ्या देशात एवढा पाऊस झाला. पूल तुटले, वाहने वाहून गेली. आटपाडीत पाऊस पडला का? सगळ्या जिल्ह्यात नगरपंचायत, पालिका झाली, निवडणुका लागतात. आटपाडीची जाहीर झाली का? मुख्यमंत्री पदावर असताना दोन वर्षांपूवी पृथ्वीराज चव्हाण यांनी टेंभूचे बटण दाबले, अजून तरी पूर्ण क्षमतेने पाणी आले का? सगळ्या मोटारी चालू झाल्या का? मग आपण या देशात आहोत का नाही? (वार्ताहर) मंडपाला जशी झालर : तसेच राजकारण! कुठल्याही मंडपाला झालर नसेल, तर चालत नाही. तसे राजकारण आहे. पण घरावर तुळशीपत्र ठेवून राजकारण करू नका, असे आवाहन राजेंद्रअण्णांनी कार्यकर्त्यांना केले. आटपाडीवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचून आटपाडी भारताच्या नकाशात आहे का नाही? येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढण्यासाठी सज्ज व्हा, असा संदेश दिला. तालुक्यावर होणाऱ्या अन्यायावर विचार करायला पाहिजे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
आता निवडणुका स्वबळावरच लढणार
By admin | Published: October 25, 2016 1:01 AM