दिलीप मोहिते -- विटा -गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना पराभव स्वीकारावा लागल्यानंतर नाराज झालेले कॉँग्रेस कार्यकर्ते पाटील यांच्या प्रदेश कॉँग्रेस उपाध्यक्ष निवडीमुळे रिचार्ज झाले असून, या निवडीनंतर उत्साही कार्यकर्त्यांनी शहरात ‘आता कसं..? सदाभाऊ म्हणतील तसं’ असे फलक चौका-चौकात झळकविले आहेत.खानापूर तालुक्यात पतंगराव कदम व सदाशिवराव पाटील समर्थक कॉँग्रेस कार्यकर्त्यांत असलेले दोन गट सर्वज्ञात आहेत. त्यातच विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचे उमेदवार पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव कदम गटामुळेच झाल्याची चर्चा होती. तीच चर्चा राज्याच्या कॉँग्रेस कमिटीपर्यंत पोहोचली. त्यामुळे पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांना त्याबाबतचा पक्षश्रेष्ठींसमोर खुलासा द्यावा लागला.गेल्या विटा पालिका निवडणुकीत पाटील यांच्याशी त्यांचे एकेकाळचे विरोधक अशोकराव गायकवाड यांनी युती केली. त्यामुळे नाराज झालेल्या गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्याशी जवळीक करीत स्वाभिमानी विकास आघाडीचा झेंडा हातात घेऊन विटा पालिकेची निवडणूक लढविली. परंतु, नगराध्यक्ष निवडीवेळी गायकवाड समर्थकांना बाजूला ठेवून डॉ. कदम समर्थक नंदकुमार पाटील यांना संधी देण्यात आली. त्यामुळे पाटील यांच्यापासून गायकवाड दुरावले गेले.माजी मंत्री कदम व पाटील यांच्यात दोन गट असल्याने गायकवाड यांनी कदम यांच्याशी पूर्वी असलेली सलगी कायम ठेवत पालिका निवडणुकीत ताकद देण्याची मागणी डॉ. कदम यांच्याकडे केली. त्यावेळी विटा पालिका निवडणूक कॉँग्रेसच्या चिन्हावरच लढविण्यात येईल, अशी घोषणा माजी मंत्री कदम यांनी केली. त्यानंतर गेल्या महिन्यात झालेल्या कॉँग्रेस मेळाव्यात पाटील समर्थकांनी गटबाजीवर तोंडसुख घेतले. त्यावेळी कदम यांनी आता जिरवाजिरवी बंद करून पालिकेवर कॉँग्रेसचा झेंडा फडविण्याचे आवाहन केले.पाटील यांच्या निवडीमुळे कॉँग्रेसचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. शहरातील विविध चौकात पाटील यांच्या अभिनंदनाचे फलक लावताना त्यावर ‘आता कसं... सदाभाऊ म्हणतील तसं’ असा मजकूर झळकला आहे. हा मजकूर म्हणजेच कदम गटाला सदाभाऊंच्या कार्यकर्त्यांनी दिलेली चपराक समजली जाते.
आता कसं..? सदाभाऊ म्हणतील तसं!
By admin | Published: April 19, 2016 12:22 AM