लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जन्मणारे मूल निरोगी आणि ठणठणीत असावे, यासाठी गर्भवतींनी आता चहा पिला तरी पुरेसे होणार आहे. अर्थात, हा चहा साधासुधा नसेल, तर औषध गुणधर्मांनी युक्त असेल. याबाबतचे संशोधन ब्रिटिश जर्नलमध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. अभिमानाची बाब म्हणजे येथील डॉ. रवींद्र व्होरा आणि काही डॉक्टरांनी केलेल्या या संशोधनामध्ये सांगलीकर बालकांनी सहभाग नोंदवला आहे.
गर्भवतीमध्ये फॉलिक ॲसिड आणि ब १२ जीवनसत्वाची कमतरता असल्यास अर्भकांमध्ये मज्जारज्जू आणि मेंदुविकारांचा धोका असतो. कायमचे अपंगत्व किंवा गतिमंदत्व ही त्याची पुढील पायरी असते. हा धोका टाळण्यासाठी सध्या गर्भावस्थेतच गोळ्या देऊन जीवनसत्वाची उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न केला जातो, तरीही दरवर्षी लाखो मुलांना या दुर्धर आजारांना तोंड द्यावे लागते.
हे लक्षात घेऊन भारतीय उपखंडात चहामधून जीवनसत्व देण्याची संकल्पना पुढे आली. अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठातील प्रा. अशोक ॲन्थनी व डॉ. गॉडफ्रे ऑकले ही जोडगोळी अनेक वर्षांपासून यावर संशोधन करत आहे. त्यांनी सांगलीत येऊन गेली तीन वर्षे डॉ. रवींद्र व्होरा यांच्यासोबत संशोधनात्मक काम केले. त्यासाठी डॉ. संतोष करमरकर, डॉ. सुधाकर जाधव, डॉ. मयूर सोनी, डॉ. अपूर्वा झरकर व मानवराहत ट्रस्ट यांनीही सहकार्य केले.
चौकट
सांगलीतील प्रयोगाचे समाधानकारक निष्कर्ष
सांगलीत एका खासगी बालरुग्णालयातील ५० गर्भवतींना चहामधून अैाषध दिले. त्याचे निष्कर्ष अत्यंत सकारात्मक आले. शरिरातील फॉलीक ॲसिड व ब १२ जीवनसत्वाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. यामुळे संशोधकांचा उत्साह दुणावला. भविष्यात भारतीय विद्यार्थिनी तसेच तासगाव तालुका व गडचिरोलीतील मुलींना अैाषधाची मात्रा चहाद्वारे दिली जाणार आहे. चहा कंपन्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हा अैाषध चहा देशभरातील पात्र महिलांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कोट
रक्तवाहिन्यातील गुठळ्या टाळण्यासाठीही फॉलिक ॲसिड व ब १२ जीवनसत्व गरजेचे असते, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनाही हा औषध चहा दिला जाणार आहे. हा चहा अैाषध असला तरी चवीला नेहमीसारखाच असेल. या प्रयोगाची व्यापकता भविष्यात वाढवली जाणार आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलने या संशोधनाच्या प्राथमिक निष्कर्षांना मान्यता दिली आहे.
- डॉ. रवींद्र व्होरा, सांगली.