आटपाडी : दुष्काळमुक्त होण्यासाठी सांगली जिल्ह्यात पहिल्यांदा आटपाडी तालुक्यात ‘नाम’ फौंडेशनने काम सुरू केले आहे. सध्या तडवळे गावात गतीने कामे सुरू आहेत. तालुक्यातील जास्तीत जास्त गावांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केले.तडवळे (ता. आटपाडी) या गावात दि. ७ पासून जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फौंडेशनच्यावतीने पोकलॅँड यंत्र देण्यात आले आहे. ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढून डिझेलची व्यवस्था केली आहे. आतापर्यंत ओढ्याचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात आले आहे. सध्या पाझर तलावही करण्यात येत आहे.टेंभू योजनेचे पाणी येऊनही कालवा नसल्याने या गावातील ८० टक्के शेतकऱ्यांना लाभ होत नाही. त्यासाठी आता कालव्याचे काम या पोकलॅँड यंत्राने करण्यात येणार आहे. त्यामुळे टेंभूचे पाणी शेटफळे, लेंगरेवाडी परिसरात पोहोचणार आहे. गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी या कामाबाबत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी आटपाडी पंचायत समितीचे उपसभापती तानाजी यमगर, सरपंच पांडुरंग शेंडे, जितेंद्र गिड्डे, बाळासाहेब गिड्डे, सचिन गिड्डे, शरद गिड्डे, दत्तात्रय गिड्डे, दादासाहेब हुबले, विनायक गिड्डे, सुशील गिड्डे, प्रकाश गिड्डे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)लोकवर्गणीचा पॅटर्नतडवळे ग्रामस्थांनी अवघ्या सात दिवसात लोकवर्गणी काढून डिझेलची व्यवस्था केली आहे. टेंभू योजनेचा पोटकालवा जिथून काढायचा आहे, तिथून अधिकारी फक्त आखणी करून देत आहेत. शासनाची वाट न पाहता हे काम रविवारपासून करण्यात येत आहे. हा पॅटर्न तालुक्यात सर्वत्र राबविणार आहे. नेलकरंजी, दिघंची येथे काम सुरू आहे. समाधानकारक कामे केलेल्या गावास अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे भेट देणार असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली.
दुष्काळ मुक्तीसाठी आता ‘नाम’ फौंडेशन सरसावले
By admin | Published: April 16, 2017 10:50 PM