सांगली : राज्यातील महाघोटाळ्यात ठाकरे सरकारचे ११ खेळाडू व एक बारावा राखीव खेळाडू अशा १२ जणांचा समावेश आहे. देशमुख, परब यांच्यानंतर आता जितेंद्र आव्हाड व भावना गवळींचा नंबर आहे, असा इशारा भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले की, सत्तेचा गैरवापर करून केवळ घोटाळे केले जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पत्नींच्या नावेही १९ बेनामी बंगले आहेत. पुराव्यानिशी या सर्वांच्या घोटाळ्यांचा पर्दापाश करणार आहे. दिवाळीपर्यंत मोठे घोटाळे उजेडात येतील. हे सरकार आल्यापासूनच राज्यात घोटाळे केले जात आहेत. लॉकडाऊन काळातही कोविड हॉस्पिटलच्या नावाखाली जागा हडप करण्याचा उद्योग मुंबईमध्ये झाला. लसींची खरेदी, रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीतही असेच व्यवहार झाले आहेत. वंजारवाडी (ता. तासगाव) येथील आरटीओ बजरंग खरमाटे व त्याच्या कुटुंबियांच्या नावे असलेली संपत्ती नेमकी त्याची आहे की अनिल परब यांची, हे समजून येत नाही. त्याची चौकशी झाली पाहिजे.
शिवसेनेने भाजपशी गद्दारी केली आहे. घोटाळा प्रकरणात आम्ही त्यांना सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
चौकट
सर्व आरटीओंची चौकशी व्हावी
राज्यातील सर्व आरटीओंच्या संपत्तीची चौकशी व्हावी. बजरंग खरमाटे अगोदरपासून सेवेत असला तरी त्याची चोरी आता उजेडात आल्याने भाजप सरकारच्या काळात त्याच्या कृत्याची कल्पना आली नव्हती, असे सोमय्या म्हणाले.
चौकट
भाजप नेते सापडले तर त्यांच्यावरही कारवाई करा
घोटाळ्यात भविष्यात कुणी भाजपचा नेता सापडला तर त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. पुराव्यानिशी आम्ही जसे मांडतो तसे पुरावे द्यावेत, असे सोमय्या म्हणाले.
चौकट
माझ्यावर वेगळी जबाबदारी
राज्यातील प्रमुख नेते माझ्यासोबत नाहीत व मला महत्त्वाचे पद नाही, हे आरोप खोटे आहेत. अन्य नेत्यांप्रमाणे माझ्यावरही वेगळी जबाबदारी आहे. ती मी व्यवस्थित पार पडत आहे. माझ्यासोबत सर्व भाजप नेते आहेत, असे सोमय्या म्हणाले.