लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सुख-समाधानाच्या आनंदलहरी...हृदयात पसरणारा प्रेमाचा दरवळ, अमृताचा आस्वाद अशा साऱ्या गोष्टी विठ्ठलाच्या चरणस्पर्शातून अनुभवणारे भाविक कोरोनामुळे या भक्तिभावापासून दुरावले गेले आहेत. तो आनंद, जगण्याचा आधार पुन्हा मिळावा म्हणून ‘संकटाला दूर करीत उघड दार देवा आता’, अशी हाक भाविकांनी मंगळवारी आषाढीच्या निमित्ताने मंदिराबाहेर उभे राहून दिली.
सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये यंदाही सलग दुसऱ्या दिवशी शांतता होती. भाविकांना मंदिराच्या बाहेरूनच देवाला नमस्कार करावा लागला. गेल्या दीड वर्षापासून प्रत्येक सण, परंपरा यांना फाटा देत नागरिकांना घरी थांबावे लागले आहे. आषाढी एकादशीची वारीची परंपरा खंडित होण्याबरोबर स्थानिक मंदिरांमधील सोहळेही थांबले आहेत. भाविकांसाठी मंदिरांचे दरवाजेही बंद आहेत. त्यामुळे देव आणि भक्तांची मंदिरातील भेट पूर्णपणे थांबली आहे.
यंदा आषाढी एकादशीलाही सर्व मंदिरे बंद होती. पहाटे मंदिरातील पुजाऱ्यांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळून पूजाविधी आटोपला. सांगलीच्या स्टेशन रोडवरील विठ्ठल मंदिरात पुजारी ज्ञानेश्वर वाघ यांनी आषाढीनिमित्त मूर्तीला अभिषेक केला, फुलांनी गाभाऱ्याची सजावट केली. गोपाळ मर्दा, दत्तात्रय चोपडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष रामभाऊ घोडके उपस्थित होते. पहाटे साडेपाच वाजता पूजा, आरती पार पडली. माधवनगर येथील मंदिरातही अभिषेक, पूजा, आरती असे कार्यक्रम पहाटे पार पडले.
दिवसभर मंदिरांच्या बंद दरवाजाजवळ धूप, अगरबत्ती व प्रसाद ठेवून भाविकांनी लांबूनच देवाला नमस्कार केला. देवाकडे संकट दूर करण्याचे साकडेही घातले. मंदिरांबाहेर दिवसभर भाविकांची ये-जा सुरू होती.
चौकट
मिरजेत विठ्ठलाला साकडे
मिरजेच्या नदीवेसमधील विठ्ठल मंदिरात मंगळवारी सकाळी विशेष पूजा, अभिषेक करण्यात आला. पुजारी दत्तात्रय पवार यांनी अभिषेक व पूजा केली. यावेळी नवनाथ माने व मोजकेच लोक उपस्थित होते. पुजारी पवार यांनी कोरोनाचे संकट दूर होण्याचे साकडे घातले.