मिरज वाहतूक पोलिसांचा पायलट
आता पोलिसांसाठीही पायलट...
मंत्रिमहोदयांच्या ताफ्यासाठी पायलट ही बाब सर्वांना माहिती झालीय, पण पोलिसांनाही आता पायलटची गरज भासू लागलीय, हे जरा अतीच होणारे. पण हे खरे आहे. मिरजेत महात्मा फुले चौकात वाहतूक पोलिसांकडून दिवसाचे सोळा-सतरा तास वाहनांची तपासणी सुरू असते. परराज्यांतील गाड्यांवर संशय जरा जास्तच. दिवसभर इतकी मेहनत म्हटल्यावर दमछाक तर होणारच. पगार दहा तासांचा आणि काम सोळा तासांचे, हादेखील अन्यायच. भार हलका होण्यासाठी पोलीसदादांना खासगी मदतनीस नेमावा लागला. दादा दिवसभर बाकड्यावर बसून असतात आणि हा मदतनीस इमानेइतबारे ड्युटी निभावतो. एकदा दादांना विचारले तेव्हा म्हणाले, हा आमचा पायलट आहे. शासनाने मिरजेच्या वाहतूक पोलिसांसाठी नव्याने पदनिर्मिती केल्याने पोलिसांचे श्रम बरेच हलके झाले आहेत.
हापीसात बसून मासेमारी!
काही अधिकाऱ्यांच्या चिरिमिरी लाटण्याच्या तऱ्हाच वेगवेगळ्या! एका महिला अधिकाऱ्याला दागिन्यांची भारी हाैस. वरच्या कमाईसाठी रोख नोटा घेण्यापेक्षा दागिने घेणे सुरक्षितदेखील. प्रत्येक महिन्याला ठराविक सराफाकडून ठरलेल्या वजनाचे दागिने घरपोहोच व्हायचे. त्याचे बिल संबंधित लोक अदा करायचे. करविषयक एका महत्त्वाच्या विभागातील सर्वोच्च अधिकाऱ्याच्या सौभाग्यवतींचे माहेर अैारंगाबादचे होते. मॅडमना माहेरचा गोतावळा आठवायचा, तेव्हा साहेबांना उद्योजकांची आठवण व्हायची. साहेबांचा फोन जाताच उद्योजकांकडून वातानुकूलित कार मॅडमच्या प्रयाणासाठी दारात सज्ज ठेवावी लागायची. तर मॅडमना उकाडा सोसायचा नाही, म्हणून गाडीत बसण्यापूर्वी अर्धा-एक तास अगोदर एसी सुरू ठेवावा लागायचा. शिवाय, प्रवासादरम्यान पोटपूजेसाठी फळांचे भरगच्च बॉक्सही ठेवावे लागायचे. साहेबांची बदली झाल्यावरच उद्योजकांचा सासूरवास थांबला. सध्या एका अधिकाऱ्याची अशीच हौसमौज चर्चेत आहे. साहेबांना मासे खाण्याची भारी हौस. पगार गलेलठ्ठ असला तरी, फुकटच्या माशांची चव जरा जास्तच खमंग. त्यामुळे एखाद्या फाईलवर साहेबांची सही व्हायची असेल, तर किलो-दोन किलो पापलेट हमखास इलाज ठरतो. साहेबांची हापीसात बसून चालणारी मासेमारी बरीच चर्चेची ठरली आहे.
पाच हाणा, पण पंच म्हणा!
सध्या विविध जातींच्या आरक्षणाची वादळे भलतीच घोंगावताहेत. तापलेल्या जनभावनांवर आपल्या नेतृत्वाची पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न अनेकजण करताहेत. पण सर्वच समुदायांनी आंदोलनासाठी कोणीच नेता असणार नाही, असा निर्धार केला आहे. सांगलीत नेतेगिरी करू पाहणाऱ्या एकाने वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाच्या प्रत्येक कामात पुढेपुढे करू लागला. मोर्चे, बैठका, अधिकाऱ्यांना निवेदने, पत्रकार बैठका आदी ठिकाणी नेतेगिरी सुरू झाली. कार्यकर्त्यांच्या लगेच लक्षात आले. मग नेत्याला जागा खड्यासारखे बाजूला काढायचे ठरले. कार्यक्रम, बैठकांची निमंत्रणे थांबवली. आंदोलनाची निमंत्रणेही बंद झाली. स्वयंघोषित नेत्याच्या लक्षात हा प्रकार येताच बिचारा घायाळ झाला. मागेमागे करू लागला. काहीही करा, पण आंदोलनात घ्या, अशी विनंती करण्याची वेळ आली. शेवटी कार्यक्रमात सतरंज्या-खुर्च्या उचलण्यापासून सुरुवात झाली. पाच हाणा, पण पंच म्हणा म्हणण्याची वेळ आली.