दत्ता पाटील - तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींतील सरपंच निवडी १६ ते १८ तारखेच्यादरम्यान होणार आहेत. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीत सुरु असलेली लढाई संपलेली नाही. दोन्ही पक्षांकडून वर्चस्वाचा दावा होत आहे, हे सिध्द करण्यासाठी सरपंच निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यामुळे आपल्याच गटाचा सरपंच व्हावा, यासाठी काठावरच्या अकरा गावांत सरपंच निवडीसाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे. त्यासाठी दोन्ही गटांकडून फिल्डिंग लावली जात आहे.तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका अटीतटीने पार पडल्या. भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन पारंपरिक गटात निवडणुका झाल्या. या निवडणुका कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांसाठी विशेष महत्त्वाच्या होत्या. त्यामुळे भापजचे खासदार संजयकाका पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. निकालानंतर दोन्ही नेत्यांसह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर आमचेच वर्चस्व असल्याचा दावा केला होता. अद्यापही दोन्ही गटांकडून त्याचीच चर्चा होत आहे. मात्र नेमके कोणाचे वर्चस्व आहे, याचा तालुक्यातील जनतेलाही संभ्रम आहे. एकहाती वर्चस्व दाखवण्याची संधी दोन्ही नेत्यांना मिळाली नाही. मात्र हे दाखवून देण्याची संधी सरपंच निवडीनंतर दोन्हीही नेत्यांना मिळणार आहे. काठावर बहुमत मिळालेल्या ग्रामपंचायतीत सर्वाधिक ९ ग्रामपंचायती आबा गटाकडे आहेत, तर काका गटाच्या तीन ग्रामपंचायती आहेत. त्यातही धामणी, नरसेवाडी, गौरगाव या ग्रामपंचातींवर दोन्ही गटाकडून दावा केला जात आहे. तसेच सावळज, लोढे, जुळेवाडी या संमिश्र ग्रामपंचायती असल्याचा दावा केला जात असला तरी, या गावांतील सरपंच कोणत्या गटाचा होणार, हेही सरपंच निवडीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे काठावरच्या आणि संमिश्र सत्ता असलेल्या गावांवर दोन्ही गटांनी लक्ष केंद्रित केल्याचे चित्र आहे. त्यामुळे निवडणुकीपाठोपाठ सरपंच निवडही लक्षवेधी ठरणार आहे.+लोढेत असाही फटका : गड आला पण...लोढे ग्रामपंचायतीत तासगाव बाजार समितीचे संचालक पितांबर पाटील आणि आर. आर. पाटील खरेदी-विक्री संघाचे संचालक विलास पाटील या नेत्यांच्या नेतृत्वाखाली परस्परविरोधी निवडणूक लढवली गेली. पितांबर पाटील गटाची ५-२ या फरकाने सत्ता आली. मात्र या गावचे आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला गटासाठी आहे. या गटातून निवडून आलेल्या दोन्ही महिला विलास पाटील गटाच्या आहेत. त्यामुळे पितांबर पाटील गटाची सत्ता आली तरी, विलास पाटील गटाला सरपंचपद मिळणार आहे.सरपंच निवड तारखा १६ नोव्हेंबर : आळते, बोरगाव ढवळी, हातनोली, जुळेवाडी, कवठेएकंद, धामणी, निंंबळक, राजापूर, शिरगाव (वि.), तुरची, विसापूर, येळावी.१७ नोव्हेंबर : धोंडेवाडी, धुळगाव, डोर्ली, गोटेवाडी, हातनूर, कौलगे, लोढे, मांजर्डे, मोराळे, नागाव (क.), नरसेवाडी, पाडळी, विजयनगर.१८ नोव्हेंबर : दहीवडी, डोंगरसोनी, गौरगाव, गव्हाण, जरंडी, लोकरेवाडी, पेड, सावळज, सिध्देवाडी, वज्रचौंडे, वडगाव, वाघापूर, यमगरवाडी.सरपंचपदाचे आरक्षणसर्वसाधारण प्रवर्ग : सावळज, विजयनगर, पेड, धामणी, गोटेवाडी, नागाव (क.), कौलगे, धुळगाव, यमगरवाडी.सर्वसाधारण प्रवर्ग महिला : आळते, हातनूर, विसापूर, शिरगाव (वि.), निंबळक, डोर्ली, वज्रचौंडे, तुरची, गौरगाव, वाघापूर, वडगाव, दहीवडी.नागरिकांचा मागास प्रवर्ग : सिध्देवाडी, पाडळी, येळावी, राजापूर, लोकरेवाडी, जुळेवाडी.नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : नरसेवाडी, लोढे, मोराळे, कवठेएकंद, जरंडी, गव्हाण, धोंडेवाडी.अनुसूचित जाती : बोरगाव, मांजर्डे, डोंगरसोनी.अनुसूचित जाती महिला : हातनोली, ढवळी.भाजप आणि राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणीग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत करण्यासाठी सुरूवातीपासून कुरघोड्यांचे राजकारण सुरू हाते. त्यानंतर आता भाजप आणि राष्ट्रवादीकडून आपल्याच पक्षाचा समर्थक सरपंच व्हावा, यासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. विशेषत: संमिश्र यश मिळालेल्या गावांत, तसेच एकाच जागेने काठावर सत्ता हस्तगत केलेल्या गावांत रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आता सरपंचपदासाठी रस्सीखेच
By admin | Published: November 09, 2015 10:09 PM