लिंगनूर : ३१ डिसेंबर २००७ पूर्वी ज्या शिक्षकांचे एमएससीआयटी झालेले नाही, तसेच ज्यांचे वय ३१ डिसेंबर २००७ रोजी पन्नास पूर्ण नाही आणि एमएससीआयटी हा कोर्स पूर्ण नाही, अशा शिक्षकांच्या पगारातून २००७ नंतर जर वेतनवाढ दिली असेल, तर त्याची वसुली करण्यात यावी. तसेच एमएससीआयटी कोर्स पूर्ण झाल्यानंतर ही वसुली पुढील काळात बंद होईल, असा यापूर्वीचाच शासनआदेश आहे. तो यापूर्वी सांगली जिल्ह्यात लागू करण्यात आला नव्हता. मात्र आता जिल्हा शिक्षण समितीने या आदेशान्वये तात्काळ वसुलीचा ठराव घेतल्याने गुरुजन वर्गात आणि त्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे. एमएससीआयटी कोर्स पूर्ण करण्यासाठी २०१५ पर्यंतची मुदतवाढीची मागणी होती. पण ती नाकारण्यात आली. आता तर शिक्षक संघटनांनी ही मुदत २०१९ पर्यंत वाढवून मिळावी, अशी मागणी केली आहे. संघटनांच्यावतीने याबाबत शासनस्तरावर एकीकडे पाठपुरावा सुरू आहे आणि याबाबत समाधानकारक निर्णय अपेक्षित आहे.दुसरीकडे शासनाने मात्र ३१ डिसेंबर ०७ रोजी एमएससीआयटी कोर्स पूर्ण नसणाऱ्या ५० वर्षांखालील शिक्षक आणि उशिराने कोर्स पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना मिळालेल्या त्या वर्षांतील वेतनवाढी वसूल करण्याचा आदेश काढून, थेट वेतनावरच ‘टाच’ आणली आहे. त्यामुळे शिक्षकांत खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)शिक्षकांवर अन्यायएमएससीआयटी कोर्स पूर्ण करण्यासाठी २०१९ पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी असून, त्याबाबतची फाईल मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागातून पुढे सरकत आहे. केवळ हा कोर्स पूर्ण केला नाही अथवा वेळेत पूर्ण केला नाही म्हणून थेट वेतनावरच वसुलीची टाच आणणे मान्य नाही. मुदतवाढ दिल्यानंतर शिक्षक कोर्स पूर्ण करतील. शासनाकडून मुदतवाढ मिळेपर्यंत वसुली नको.- किरण गायकवाड, राज्य कोषाध्यक्ष, शिक्षक समिती
आता गुरुजींच्या वेतनवाढीवर टाच!
By admin | Published: June 24, 2015 12:20 AM