संतोष भिसेसांगली : लम्पीमुळे जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला, पण बळिराजाने यावर मार्ग काढताना समाजमाध्यमांचा आधार घेतला आहे. जनावरांचे ऑनलाईन बाजार सुरू केले आहेत. त्याला प्रतिसादही चांगला आहे.लम्पीचा फैलाव रोखण्यासाठी मोठ्या जनावरांच्या बाजारांना मनाई आहे, यामुळे खरेदी-विक्री ठप्प झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात मिरज, पंढरपूर, आटपाडी, विटा, सांगोला, कराड, जत, फलटण, आदी बाजारांत कोट्यवधींची उलाढाल होते. गणेशोत्सवापासून बाजार जोरात सुरू होतात. विशेषत: शर्यतीच्या बैलांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. दिवाळीपासून यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू होत असल्याने शेतकरी शर्यतीच्या बैलांची खरेदी करतात. पण, लम्पीमुळे व्यवहारांना ब्रेक लागला आहे.
असा चालतो बाजारया स्थितीत शेतकरी व व्यापाऱ्यांनी सोशल मीडियावर बाजार भरवायला सुरुवात केली आहे. व्हॉटसॲप व फेसबुकचे ग्रुप तयार केले आहेत. त्यावर जनावरांचे फोटो पोस्ट केले जातात. त्याचे वय, दातांची संख्या, शर्यतीत धावण्याचा अनुभव, वेगवेगळ्या प्रदर्शनांत मिळविलेली पारितोषिके, गाय, म्हैस असेल त दुधाचे प्रमाण, वेत असा तपशील दिला जातो. प्रसंगी अपेक्षित किंमतही नमूद केली जाते. खरेदीसाठी इच्छुक शेतकरी चॅटिंग किंवा थेट संपर्काद्वारे व्यवहार करतो. प्रत्यक्ष खरेदी गोठ्यात जनावराच्या पाहणीअंतीच होते.
कोरोनाने दाखविला मार्गकोरोनाने शेतकऱ्यांना ऑनलाईन बाजारांचा मार्ग दाखविला. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या बाजारांना कोरोना आणि लॉकडाऊनने अचानक ब्रेक लागला. काही दिवस बाजारबंदीचा सामना केलेल्या शेतकरी व व्यापाऱ्यांनी अखेर ऑनलाईन प्लॅटफार्मवर बाजार भरवायला सुरुवात केली. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या लम्पीमुळे बाजारबंदी लागू होताच, पुन्हा ऑनलाईन व्यवहार सुरू झाले आहेत.
लम्पीच्या संकटात लाखमोलाचे पशुधन संकटात सापडले आहे. या स्थितीत शेतकऱ्यांनी बाजारबंदी स्वीकारली आहे, पण सोशल मीडियाने त्याला आधार दिला असून, गाय, बैल आणि म्हशींचे व्यवहार सुरू आहेत. शेतकऱ्यांनी अन्य जनावरांसोबत कमीतकमी संपर्क ठेवून व्यवहार करावेत. - महादेव कोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य, शेतकरी संघटना