शीतल पाटील --- सांगली -महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीत विशाल पाटील गट व स्वाभिमानी आघाडीवर कुरघोडी करण्याची मदनभाऊ पाटील गटाची खेळी चांगलीच अंगलट आली आहे. विशाल पाटील गटाने कायदेशीर डावपेच आखत मदनभाऊ गट व राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे. ‘आता आमची बारी...’ म्हणत स्थायी सदस्य निवडीसोबतच महापौर हारुण शिकलगार यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. महिन्यापूर्वी विशाल पाटील गटाला कोंडीत पकडण्याच्या चक्रव्यूहात खुद्द मदनभाऊ गटच अडकला आहे. त्यामुळे स्थायी समितीचे भवितव्य आणखी काही काळ तरी अधांतरीच राहणार आहे. महापालिकेच्या राजकारणात एकमेकांवर कुरघोड्या, शह-काटशहच्या खेळ्या काही नवीन नाहीत. पालिकेच्या स्थापनेपासूनच प्रत्येक गट, पक्षाच्या राजकारणात त्याचे प्रतिबिंब दिसत असते. कोण कुणाचा मित्र आणि कोण कुणाचा शत्रू, हेच इथे कळायला मार्ग नाही. ज्यांनी ही स्थिती निर्माण केली, त्या पक्षातील सदस्यांनाही आपण नेमके कुठल्या पक्षाचे, कुठल्या गटाचे असा प्रश्न कधी कधी पडतो. सध्या पालिकेत मदनभाऊ गट व राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती आहे. कधी कधी ही युती उघडपणे समोर येते, तर विशाल पाटील व संभाजी पवार यांच्या समर्थक नगरसेवकांनी एकत्रित येत नवीनच आघाडी उघडली आहे. कधी काळी हे सारे गट एकमेकांवर तुटून पडत असत! पालिकेतील सत्तेची सूत्रे मदनभाऊ गटाकडे असली तरी, विशाल पाटील गट हा डोकेदुखी ठरला आहे. त्यात संभाजी पवार यांची स्वाभिमानी आघाडी मदतीला असल्याने विशाल पाटील गटाचे बळ वाढले आहे. त्याला शह देण्यासाठी मदनभाऊ गटातील ‘दादा’ मंडळींनी स्थायी सदस्य निवडीचा मुहूर्त निवडला. स्थायी समितीत स्वाभिमानी आघाडीच्या दोन सदस्यांचा कोटा आहे. हा हक्कच सत्ताधाऱ्यांना डावलला. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. न्यायालयानेही सत्ताधाऱ्यांना फटकारत सदस्य निवडीसाठी सभा बोलाविण्याचे आदेश दिले. तरीही सत्ताधाऱ्यांतील कायदेतज्ज्ञ नगरसेवकांनी त्यातही काड्या घालण्याची तयारी चालविली आहे. त्यातूनही महापौर हारुण शिकलगार यांनी येत्या १५ रोजी सभा बोलाविली आहे. सभेच्या अजेंड्यावर स्वाभिमानीचा लिफाफा उघडून दोन सदस्य निवडीचा विषयही घेतला आहे. यातून सत्ताधाऱ्यांनी निवडीच्या प्रकरणात माघार घेतल्याचे स्पष्ट झाले होते. मदनभाऊ गटाने खेळलेली खेळी त्यांच्या अंगलट आली होती. त्यात आता विशाल पाटील गटानेही कुरघोडी करीत सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला आहे, पण हा वार करताना केवळ मदनभाऊ गटालाच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने आमदार जयंत पाटील यांनाही शह देण्याची खेळी खेळली आहे. स्थायी सदस्य निवडीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका शुभांगी देवमाने व अल्लाउद्दीन काझी या दोन नगरसेवकांना थेट उच्च न्यायालयातच आव्हान दिले आहे. देवमाने व काझी हे दोन नगरसेवक राष्ट्रवादीत असले तरी, विशाल पाटील गटाकडून ते आमच्या गटात असल्याचा वारंवार दावा केला जातो. त्यामुळे या कायदेशीर लढाईच्या पडद्यामागे विशाल पाटील गटच असल्याची चर्चा आहे. एकाच बाणात मदनभाऊ गट व राष्ट्रवादीला घायाळ करण्याची खेळी विशाल पाटील गटाने खेळली आहे. दुसरीकडे मनसेचे आशिष कोरी यांनी महापौर शिकलगार व नगरसचिवांविरोधात खोटा ठराव केल्याबद्दल न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. एकाचवेळी खोटा ठराव व गत महासभा रद्द करण्याची कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. या दोन्ही पातळीवर महापौर शिकलगार व प्रशासनाला लढावे लागणार आहे. स्थायीचे अधिकार : महासभेला हवेत स्थायी समिती गठित होऊन सभापती निवड होऊ नये, यासाठी सत्ताधारी गटातील काही मंडळींनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यामागे अर्थपूर्ण कारण असल्याचीही चर्चा आहे. स्थायी समितीचे अधिकार महासभेला हवे आहेत. भविष्यात महापालिकेला अमृत योजनेसह विविध शासकीय योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार आहे. हा निधी खर्च करण्याचे अधिकार स्थायी समितीला आहेत. त्यामुळे त्यातील मलिदा केवळ स्थायीच्या सोळा सदस्यांच्या वाट्यालाच येणार, हेही स्पष्ट आहे. त्यासाठी स्थायी समितीच अस्तित्वात राहिली नाही, तर त्याचे अधिकार आपसुकच महासभेकडे येतील. कोट्यवधीची कामे महासभेकडून मंजूर होतील. त्यातील मलिदाही सर्वांच्या वाट्याला येईल, अशी खेळी खेळली जात आहे. सत्ताधारी गटातील दिग्गज नगरसेवकांच्या खेळीला विशाल पाटील गटाच्या कुरघोडीने आणखी बळ मिळणार आहे. कायदेशीर लढाई लांबली तर, या मंडळींचा उद्देश सफल होणार असल्याची चर्चा आहे. आज सुनावणीगत महासभेत स्थायी समितीच्या सहा सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीला आव्हान देणारी याचिका राष्ट्रवादीच्या शुभांगी देवमाने व अल्लाउद्दीन काझी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होत आहे. न्यायालयाने महापालिकेला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नगरसचिव के. सी. हळिंगळे मुंबईला रवाना झाले असून ते म्हणणे सादर करणार आहेत.
आता बारी विशाल गटाची!
By admin | Published: October 13, 2016 2:32 AM