गजानन पाटील ।संख : जत तालुक्यात बेदाण्याची प्रतवारी ग्रीडिंग करण्यासाठी इस्त्राईल तंत्रज्ञानाचे नेटिंग यंत्र उभारले आहे. आता बेदाण्यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर होऊ लागला आहे. बेदाण्याची प्रतवारी, ग्रीडिंग करणे, स्वच्छता करणे यामुळे सोपे झाले आहे.
लहान यंत्र एक तासात एक ते दीड टन व मोठे यंत्र दोन ते अडीच टन बेदाणा प्रतवारी करून स्वच्छ करते. मजुराद्वारे ही बेदाण्याची कामे करण्यासाठी चार ते पाच दिवस लागायचे. ते काम आता केवळ दोन दिवसात पूर्ण होऊ लागले आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या वेळेची व श्रमाची बचत झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
तालुक्यातील उमदी, बेळोंडगी, बालगाव, हळ्ळी, सुसलाद, सोनलगी, करजगी, बोर्गी, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, कोंतेवबोबलाद, दरीकोणूर, पाच्छापूर, मुचंडी भागातील शेतकरी बेदाणा उत्पादन करतात. तालुक्यात तीन हजार बेदाणा निर्मितीची शेड आहेत. तालुक्यात कोरडे हवामान असल्याने या भागात सुटेखान, हिरवा, पिवळा असा दर्जेदार बेदाणा तयार होतो. बेदाण्याच्या प्रतवारीनुसार दर ठरतात.
द्राक्षे शेडवर टाकल्यावर आठ ते दहा दिवसांत बेदाणा तयार होतो. बेदाणा तयार झाल्यावर बेदाण्याची प्रतवारी करणे, स्वच्छ करणे, नेटिंग करणे, पॅकिंग, वजन करणे ही किचकट वेळखाऊ प्रक्रिया आहे. या प्रक्रियेसाठी बेदाणा नेटिंग यंत्र बसविले आहे. तालुक्यात उमदी, संख, सिध्दनाथ, मुचंडी, कागनरी, बालगाव, हळ्ळी, सुसलाद, सोनलगी या भागात बेदाणा नेटिंग यंत्रे आहेत.
बेदाणा शेडवर यांत्रिकीकरणास सुरुवात केली आहे. यामुळे बेदाणा प्रतवारी, ग्रीडिंग, स्वच्छ होत असल्याने वेळेची बचत झाली आहे. तसेच चांगली प्रतवारी आणि स्वच्छ पॅकिंग होत असल्याने दरही चांगला मिळतो.-कामाण्णा पाटील, बेदाणा उत्पादक शेतकरी.यावर्षी बेदाण्याचे उत्पादन चांगले आहे. नेटिंग यंत्राचा चांगला उपयोग झाला आहे. बेदाण्याची प्रतवारी दर्जेदार, चांगली स्वच्छता, पॅकिंग ही सर्व कामे एकाचवेळी होत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ व श्रमाची बचत होते.- जगदीश माळी, नेटिंग यंत्रचालक, सिध्दनाथ