सांगली : आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. १ जानेवारी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांनाच मतदार नोंदणी करता येत होती. आता २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी १८ वर्ष पूर्ण करणारे मतदारही नोंदणी करु शकतील. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी ही माहिती दिली.९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत विशेष आगाऊ मतदार नोंदणीही करता येणार आहे. ९ नोव्हेंबररोजी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये, तसेच मतदान केंद्रावर यादी प्रकाशित केली जाणार आहे. मतदारांनी त्यामध्ये आपला तपशील तपासून पहायचा आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीवेळी मतदानापासून वंचित रहावे लागणार नाही. एखाद्याच्या नावासंबंधी हरकत घेणे, मतदार दिलेल्या पत्यावर राहत नसेल किंवा मयत असेल तर आक्षेप घेणे अशी कामेही या मुदतीत करता येतील. मतदार यादी पुनरीक्षणासाठी १९ व २० नोव्हेंबर आणि ३ व ४ डिसेंबररोजी राज्यभरात विशेष शिबिरे आयोजित केली आहेत.तृतीयपंथी, देहविक्रेत्यांसाठी विशेष शिबिरे१२ व १३ नोव्हेंबररोजी महिला आणि दिव्यांगांच्या नोंदणीसाठी, २६ व २७ नोव्हेंबररोजी तृतीयपंथी, देहविक्रेत्या महिला, बेघर, भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक यांच्यासाठी विशेष शिबिरे घेतली जातील. १० नोव्हेंबररोजी मतदार यादी वाचनासाठी विशेष ग्रामसभा आयोजित केल्या जाणार आहेत. नव्याने नोंदणीही केली जाईल.
मतदार नोंदणीची चिंता मिटली, आता वर्षातून चारवेळा करता येणार नोंदणी
By संतोष भिसे | Published: November 08, 2022 2:40 PM