शिराळा : ‘नागपंचमीसाठी काय पण...’ असा नारा देत जिवंत नागपूजेस परवानगी मिळावी यासाठी शिराळकर सरसावले आहेत. फटाकेमुक्त दीपावली साजरी करून त्यातून वाचलेले पैसे, वाढदिवस साजरा न करता त्याचे पैसे, दीपावलीतील किल्ला स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम नागपंचमी बचाव कृती समितीस न्यायालयीन लढ्यासाठी देण्याचे शिराळकरांनी मंगळवारी जाहीर केले. निवडणुकीवर बहिष्काराबरोबरच आता शासनाचे कर न देता असहकाराचे अस्त्र उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.नागपंचमीबाबत बचाव कृती समितीमार्फत येथील मरिमी चौकात नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मंगळवारी शिराळा बंद ठेवण्यात आले होते. रात्री कृती समितीमार्फत न्यायालयीन लढाईबाबतची प्रगती, निवडणूक बहिष्कार व पुढील आंदोलनाची दिशा याबाबत नागरिकांची बैठक घेण्यात आली. विनायक गायकवाड यांनी माहिती दिली. त्यानंतर अॅड. प्रदीप जोशी, अॅड. नरेंद्र सूर्यवंशी यांनी न्यायालयीन कामकाजाची माहिती दिली.पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. भगतसिंग नाईक म्हणाले की, निवडणूक बहिष्काराचा निर्णय योग्य आहे. आता शासनाचे शेतसारा आदी कर न भरण्याबाबतही निर्णय घ्यावा. त्यास सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला. जि. प. सदस्या वैशाली नाईक, सुनंदा सोनटक्के, संगीता साळुंखे, रुपाली कदम, प्रतीक्षा निकम या महिलांनी, आपण सर्व महिलाही आंदोलनात उतरणार असल्याचे सांगितले.अजय जाधव, सम्राट शिंदे, संभाजीराव नलवडे, भीमराव गायकवाड, माजी जि. प. सदस्य महादेव कदम, जयसिंगराव शिंदे, प्रताप पाटील, बाबालाल मुजावर यांनीही मनोगत व्यक्त केले. न्यायालयीन लढ्याबरोबरच कायद्यात बदल करण्याच्यादृष्टीने कायदे मंडळाकडे प्रस्ताव पाठवणे, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे प्रस्ताव पाठविणे आदी निर्णय घेण्यात आले.रणजितसिंह नाईक, प्रमोद नाईक, अभिजित नाईक, केदार नलवडे, लालासाहेब शिंदे, संदीप पाटील, संतोष गायकवाड, विश्वास कदम, डी. जी. आत्तार, उत्तम निकम, गजानन सोनटक्के, देवेंद्र पाटील, वसंत कांबळे, संगीता खटावकर, सुनील कवठेकर, लालासाहेब तांबीट, प्रवीण शेटे उपस्थित होते. (वार्ताहर)न्यायालयात लढा : निधी संकलन सुरुबसवेश्वर शेटे, सत्यजित कदम यांनी वाढदिवस साजरा न करता अनुक्रमे १५ हजार व ११ हजार रुपये, तसेच केदार नलवडे यांनी ५१ हजार रुपये कृती समितीला देणार असल्याचे यावेळी जाहीर केले.दीपावलीत फटाके न उडविता त्याचे पैसे कृती समितीला देण्याचे ठरले. यामुळे पर्यावरणाचेही संवर्धन होण्यास मदत होणार आहे. हिंदवी स्वराज्य गु्रपमार्फत दरवर्षी किल्ला स्पर्धा घेण्यात येते. यावर्षी त्यांनी स्पर्धा रद्द करुन, यातील बक्षिसाची रक्कम कृती समितीला देण्याचे जाहीर केले.अॅड. भगतसिंग नाईक यांनी, आता फक्त ‘३२ शिराळा’ असे गावाचे नाव न लावता, प्रत्येकाने ‘नागपंचमीचे ३२ शिराळा’ असे नाव दुकानांच्या फलकांवर, व्हिजिटिंग कार्ड आदींवर लिहावे, असे सांगितले.निवडणूक बहिष्काराबरोबरच कोणताही शासकीय कर न भरता, असहकाराचा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता नागपंचमीसाठी काय पण..!
By admin | Published: October 19, 2016 11:53 PM