कसबे डिग्रज : कसबे डिग्रज
येथील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या गावात ८५ रुग्ण बाधित आहेत. त्यापैकी गृहविलगीकरणात ३० रुग्ण, संस्था विलगीकरणामध्ये ३२ रुग्ण, तर रुग्णालयांमध्ये २३ रुग्ण आहेत. गावातील रुग्णांची संख्या कमी व्हावी, कोरोना साखळी तुटावी, यासाठी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, ज्येष्ठ नेते आनंदराव नलवडे ग्रामपंचायत यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
कसबे डिग्रजमधील संस्था विलगीकरणामध्ये असणाऱ्या लोकांना सामाजिक बांधीलकी म्हणून हॉटेल फौजीतर्फे जेवणवाटप करण्यात येत आहे. ज्या कोरोनाबाधितांना घरातून जेवण डबा आणून देण्यास अडचण आहे, अशा बाधितांना मोफत जेवण डबा पोहोच केला जात आहे.
हॉटेल फौजीच्या माध्यमातून आतापर्यंत सांगली, आष्टा, इनाम धामणीमधील कोरोना सेंटरमध्ये दररोज सुमारे ५० रुग्णांना जेवणवाटप करण्यात आले आहे. हॉटेल फौजीच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत आहे. नागरिकांमधूनदेखील समाधान व्यक्त होत आहे. यासाठी सुनील पांढरे, सचिन कांबळे, सनी गायकवाड, संदेश पांढरे, गजानन कांबळे, सुनील मोरे आदी संयोजक काम करीत आहेत.