सांगली : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांत उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या अधिक असल्याचे चित्र आहे. आ. जयंत पाटील, आ. विश्वजित कदम, सदाशिवराव पाटील, डॉ. रवींद्र आरळी यांनी उच्चशिक्षण प्राप्त केले आहे. वयाचा विचार केल्यास तरुण उमेदवारांची संख्या कमी आहे. जिल्ह्यातील आठ मतदारसंघात सर्वात कमी ३२ वर्षे वयाचे उमेदवार सम्राट महाडिक आहेत. मोजके उमेदवारच चाळिशीच्या आतील आहेत.
शिक्षणाबाबतीत पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून कॉँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम सरस ठरले आहेत. त्यांनी बीई, एमबीएसह व्यवस्थापन शास्त्रातील पीएच.डी. ही पदवी मिळविली आहे. राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे बी. ई. सिव्हिल इतके शिक्षण आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार गौरव नायकवडी यांचे बारावीपर्यंत, तर इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे बी. ए. पर्यंत शिक्षण झाले आहे.मिरजेचे भाजपचे उमेदवार आणि सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे व त्यांचे प्रतिस्पर्धी आघाडीचे उमेदवार बाळासाहेब होनमोरे या दोघांचेही शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. तासगाव-कवठेमहांकाळमधील राष्टÑवादीच्या उमेदवार सुमनताई पाटील यांचे शिक्षण सहावीपर्यंत झाले आहे. कॉँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचे शिक्षण बी. फार्म. झाले आहे. अजितराव घोरपडे यांचे शिक्षण बी. कॉम. पर्यंत झाले आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच सर्वच पक्षांकडून नव्या पिढीला वाव देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार तरुणांकडून उमेदवारीची अपेक्षाही होती; मात्र राजकीय साठमारीत अपवाद वगळता, मातब्बर उमेदवारांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. तर तरुणांना पुन्हा एकदा ‘वेटिंग’वर ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील दीडशेहून अधिक उमेदवारांमध्ये तरुणांची संख्या कमीच आहे. सम्राट महाडिक तरुण उमेदवार असून त्यांचे वय ३२ वर्षे आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून बीए, तर शिवाजी विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. गौरव नायकवडी यांचे वय ३६ असून, तेही तरुण उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज दाखल केलेले मिरजेचे उमेदवार नानासाहेब वाघमारे हेही तरुण उमेदवार आहेत. यासह काही तरुणांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले असले तरी, त्यांची संख्या कमीच आहे.डॉक्टर, वकिलांचाही समावेश...शिक्षणामध्ये खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेले अपक्ष उमेदवार सदाशिवराव पाटील यांनी बीए., एलएलबी शिक्षण पूर्ण केले आहे. जत मतदारसंघातील तिसऱ्या आघाडीचे उमेदवार डॉ. रवींद्र आरळी हे एम. डी. आहेत.