शरद जाधव ।सांगली : पावसाने दिलेली ओढ व तीव्र पाणीटंचाईमुळे शेतातील कामे थांबली असतानाच, आता ‘मनरेगां’तर्गत (महात्मा गांधी रोजगार हमी) जिल्हाभर सुरू असलेल्या कामांवर मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात गेल्या दीड वर्षापासून एकदाही समाधानकारक पाऊस न झाल्याने राज्य शासनाने गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मनरेगाच्या कामांवर २३ हजारावर मजूर काम करत आहेत. गतवर्षी हीच संख्या साडे सहा हजार होती.जिल्ह्याचा पूर्व भाग नेहमीच दुष्काळाच्या झळांनी होरपळत असतो. पाणी योजनांच्या माध्यमातून यातील काही भाागात पाणी पोहोचले असले तरी, पाचवीला पूजलेला दुष्काळ हटण्याचे नाव घेत नाही. यामुळेच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. स्वाभाविकपणे शेतीतील कामे थांबली आहेत. जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव पूर्व भागातही दाहकता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कामे करण्याबरोबरच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.
रस्त्यांची दुरूस्ती, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड, मुरुमीकरण, विहिरींची कामे, पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी फळबाग लागवड, बांधबंदिस्ती यासह इतर कामे ग्रामपंचायतीसह इतर विभागाकडून सुरू आहेत. जलयुक्त शिवार योजनेतील अनेक कामे मनरेगाअंतर्गत सुरू आहेत.या आठवड्यातील मनरेगावर कार्यरत मजुरांचा आढावा घेतला असता, मजुरांच्या संख्येत वाढच होत आहे. ही संख्या गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १४९ कामांवर ५ हजार १३४ मजूर आटपाडी तालुक्यात कार्यरत आहेत, तर तासगाव तालुक्यात ४ हजार ७०४ मजूर मनरेगाच्या कामावर राबत आहेत. जिल्ह्यात ५२३ कामे सुरू असून यात ग्रामपंचायतीमार्फत ३०७, तर इतर विभागामार्फत २४९ कामे सुरू आहेत.
विशेष म्हणजे केवळ दुष्काळी तालुकेच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातच मनरेगांतर्गत कामे सुरू आहेत. यात वाळवा, पलूस तालुक्यात कामांची संख्या लक्षणीय आहे. जिल्ह्यातील ६९९ ग्रामपंचायतींपैकी २४९ ग्रामपंचायतींकडून मनरेगाची कामे सुरू करण्यात आली आहेत.जानेवारीनंतर दुष्काळाची दाहकता आणखी वाढणार आहे. त्यामुळे जूनपर्यंतच्या कालावधित मजुरांना काम मिळेल याचे नियोजन केले आहे. रब्बी हंगाम बहरात असताना, पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांना मनरेगाच्या कामावर जावे लागत असल्याने, दुष्काळीची जिल्ह्यातील तीव्रता स्पष्टपणे दिसत आहे.लोकसहभागातून : कामांना प्राधान्यजिल्ह्यातील सर्वच दहा तालुक्यात मनरेगाची कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तालुक्यात दुष्काळाची दाहकता नसली तरी, या भागातील कामे लोकसहभागातून करण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे केवळ दुष्काळीच नव्हे, तर सधन भागातील कामे होण्यासही मदत होत आहे. विशेष म्हणजे दुष्काळाचे गंभीर रूप असलेल्या जत तालुक्यात मनरेगाच्या कामांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असल्याने याठिकाणी तुलनेने कमी कामे सुरू आहेत.
अशी बदलली स्थितीजिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कामावर गतवर्षी साडेसहा हजार मजूर काम करीत होते. यंदा नोव्हेंबर २0१९ पर्यंत मजुरांची संख्याही १0 हजाराच्या घरात होती. ती जानेवारीपर्यंत आता २३ हजाराच्या घरात गेली आहे. दोन महिन्यात अचानक दुप्पट वाढ झाल्याने दुष्काळाची दाहकता दिसून येत आहे.